उल्हासनगरः उल्हासनगर कॅम्प ५ परिसरातील रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हिललाईन पोलीस ठाणे आणि इंडसलँड बँकेसमोरील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या कामात नाल्याच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नाल्याचे काम न करताच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. तेही अपूर्ण आणि अनियमीतपणे केल्याने त्याचा वाहनचालकांना फटका बसतो आहे. या रस्त्याखाली मोठा नाला असूनही त्याचे संरचनात्मक लेखापरिक्षण आणि दुरूस्ती न करता थेट डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने नागरिकांत नाराजी आहे.

उल्हासनगर शहरात रस्ते, नाले बांधणी आणि देखभाल दुरूस्ती ही नागरिकांसाठी संकटस्थितीप्रमाणे भासते. उल्हासनगर शहरातील अनेक रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी, नाल्यांच्या कामासाठी खोदकाम केले गेले. यात सुरक्षेची काळजी न घेतल्याने अनेक अपघात झाले. अनेक कामांमध्ये दुर्लक्ष केले गेल्याने नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. तर अनेक जण जखमीही झालेले आहेत. त्यानंतरही शहरातील बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभार अद्याप संपलेला नाही. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात अशा एका रस्तेकामावरून सध्या नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या नाल्याची स्थिती कमकुवत असून कोणतीही दुरुस्ती न करता रस्ता तयार केला, तर तो भविष्यात खचण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून रखडलेले होते. अधूनमधून काम सुरू होऊन पुन्हा थांबवले जात असते. परिणामी संपूर्ण परिसरात खोदलेले रस्ते, मोठमोठे खड्डे, अर्धवट आणि उघडे नाले यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास वाढतो आहे. पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून वाहनचालकांसाठीही मार्ग अडथळ्याचा झाला आहे.

या कामासंदर्भात कोणतीही पूर्वतयारी, लेखापरिक्षण किंवा योग्य नियोजन न केल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. केवळ वरवरचा रस्ता तयार केल्यास भविष्यात पुन्हा रस्ता खोदून नाल्याच्या कामासाठी आणि पर्यायाने रस्त्याच्या दुरुस्तीवर पैसे खर्च करावे लागतील, अशीही भीती नागरिकांना वाटते आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की, रस्ता तयार करण्याआधी नाल्याचे मजबुतीकरण पूर्ण करण्यात यावे. अन्यथा हा रस्ता काही महिन्यांतच खचण्याचा धोका असून त्यात अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.