ठाणे – शहापूर तालुक्यातील उंबरमळी गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मृतदेह खांद्यावरून नेत, घनदाट जंगल आणि ओढा पार करून न्यावे लागल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उंबरमळी गावासाठी एक पक्की स्मशानभूमी आणि रस्ता बांधून द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहे. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना मृत्यनंतरही सन्मानपूर्वक अंतविधी करणे शक्य होत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून शहापूर तालुका ओळखला जातो. तर आदिवासी बहुल भाग असल्याने हा जिल्हा १०० टक्के पेसा क्षेत्र आहे. मात्र असे असूनसुद्धा देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतका कालावधी उलटून ही येथील नागरिक रस्ता, पाणी आणि वीज यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहे. यामुळे शहापूर तालुका हा समस्यांचा तालुका म्हणून देखील ओळखला जाऊ लागला आहे, मात्र जिल्हा प्रशासनाला आणि सरकारला याचे कोणतेही सोयर सुतक नसल्याने येथील ग्रामस्थांच्या नशिबी हालच सोसावे लागत आहे. तर सर्वात म्हणजे राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांमधील ठाणे जिल्ह्याचा हा भाग असून सुद्धा शहापूर कडे कायमच जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे.चौकट
शहापूर मध्ये अनेक आदिवासी गाव-पाडे आहे. यातील शिरोळ ग्रामपंचायतच्या अखत्यारित उंबरमाळी गाव येते. या गावात एक लहान स्मशानभूमी बांधून देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. मात्र अद्यापही त्यांच्या मागणीची कोणीही दखल घेतली नसल्याने गावात मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीच उपलब्ध नाही. तर गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास ग्रामस्थांकडून गावाच्या बाहेर दूर अंतरावर एका मोकळ्या माळरानावर मृतदेह जाळण्यात येतात. मात्र त्याकडे जाण्याची वाट ही खडतर असल्याने अत्यंत कसरत करत ओढा, नाला आणि घनदाट जंगल यातून वाट काढत या मोकळ्या जागेपर्यंत पोहोचावे लागते. यावेळी मृतदेहाची अनेकदा हेळसांड होते. मात्र याला इलाज नसल्याने गावकऱ्यांना देखील याच पद्धतीने मृतदेह न्यावा लागतो. यामुळे किमान या ठिकाणी जाण्यासाठी तरी पक्का रस्ता असावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ठाणे : उंबरमळी गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मृतदेह खांद्यावरून नेत, घनदाट जंगल आणि ओढा पार करून न्यावे लागल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उंबरमळी गावासाठी पक्की स्मशानभूमी आणि रस्ता बांधून द्यावा अशी मागणी… pic.twitter.com/KrlItuWI12
— LoksattaLive (@LoksattaLive) August 24, 2025
झाले काय ?
उंबरमाळी गावातील ग्रामस्थ मुकुंद वाघ ( ७६ ) यांचे निधन झाले. यावेळी त्यांचा मृतदेह नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. यावेळी काही किमी मृतदेह पायी न्यावा लागला. यावेळी रस्त्यातील पूर्णपणे प्रवाही असलेले लहान ओढे – नाले पार करत मृतदेह न्यावा लागला.