ठाणे – वसई, पालघर, ठाणे खाडी, कोपर, उंबार्ली टेकडी यांसारख्या भागात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून युरोप, सायबेरिया, आफ्रिका यांसारख्या देशातुन स्थलांतरित पक्षी काही काळासाठी येतात. मात्र यंदा बदलेले हवामान आणि पावसाचा वाढलेला मुक्काम या स्थलांतराच्या मार्गातील अडथळे ठरू लागल्याचे निरीक्षण काही पक्षी निरीक्षकांनी नोंदविले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या सर्व ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींचे पक्षी येतात. यानंतर पक्षी सप्ताहाच्या निमिताने निरीक्षक आणि छायाचित्रकार याठिकाणी मोठी गर्दी करतात. मात्र यंदा या सर्व पक्ष्यांची संख्या अगदी तुरळक अशी दिसून येत आहे. तर लांबलेल्या पावसामुळे आपल्या परतीच्या मार्गावर असलेल्या परदेशी पक्ष्यांचा मुक्काम देखील वाढला असल्याची नोंदही काही निरीक्षकांनी केली आहे.
हिवाळ्यात युरोपीय देशांतून स्थलांतरित पक्षी डोंबिवली नजीक भोपर, कोपर, उंबार्ली टेकडी, सातपूल येथे आढळतात. मात्र गेली काही वर्षे पक्ष्यांच्या अधिवासातील वाढते बांधकाम आणि लोकवस्तीमुळे ही संख्या कमी झाली आहे. तर सध्याची परिस्थिती पाहता भोपर तसेच सातपुल येथील नैसर्गिक अधिवासच बांधकामामुळे नष्ट झाल्याने या ठिकाणी स्थलांतरीत पक्षी येणेच बंद झाले आहे. तर कोपर येथील खाडी, ठाणे खाडी, वसई, पालघर येथे हे स्थलांतरित पक्षी आढळून येतात. तलवार बदक, थापट्या, चक्रांग, काष्ठ तुतवार, मोठ्या ठिपक्यांचा गरुड, भुवई बदक, छोटा पाणलावा, लाल डोक्याचा रेडवी, करड्या मानेचा रेडवी, पांढुरक्या भोवत्या, कंठेरी चिखल्या,सामान्य टोळ वटवट्या, पिवळा धोबी, नेपाळी गरुड, मोठा ठिपक्यांचा गरुड, पांढूरका भोवत्या, काळया डोक्याचा भारीट यांसारखे पक्षी स्थलांतर करून विविध ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. मात्र यंदा यांची संख्या दुर्मिळ आहे.
युरोपात आणि इतर देशांमध्ये थंडीचा कडाखा वाढू लागला की हे सर्व पक्षी भारतात स्थलांतर करतात. उत्तर भारतात काही काळ थांबून मग महाराष्ट्रातील काही ठिकाणी ते मुक्काम करतात आणि मग इकडे काही काळ थांबून ते पुढील प्रवास करतात. ऑक्टोबर अखेर विविध प्रजातींचे पक्षी मोठया संख्येने या ठिकाणी येतात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या निश्चित स्थळी येतात. यंदा मात्र अगदी शोधून असे पक्षी दिसत असल्याचे डोंबिवली येथिल पक्षी निरीक्षक अर्णव पटवर्धन यांनी सांगितले आहे.
डोंबिवली येथील उंबार्ली टेकडी, कोपर आणि ठाणे खाडी तसेच वसईतील भुईगाव, गोगटे मिठागर, अर्नाळा बीच, तुंगारेश्वर अभयारण्य वसई, पालघर येथे हे स्थलांतरित पक्षी येतात.
यंदा हवामानात मोठा बदल झाले आहे. पावसाचा मुक्काम वाढला आहे. तसेच अदयाप हवी तशी थंडी देखील सुरू झालेली नाही. यामुळे स्थलांतरित पक्षी अद्याप दाखल झालेले नाही. यंदाचा हा स्थलांतराचा हंगाम लांबून नोव्हेंबर अखेपर्यंत मोठया प्रमाणात हे पक्षी दिसण्याची शक्यता आहे. तर यामुळे पक्षांचा पुढचा मुक्काम देखील लांबू शकतो. तर यातील महत्वाची बाब म्हणजे काही पक्षी ज्यांचा परतीचा प्रवास या काळात होतो. वातावरणीय बदलामुळे त्यांची वाट चुकून त्यांनी यंदा वसई आणि ठाणे खाडी येथे मुक्काम घेतला आहे.- डॉ.सुधीर गायकवाड, ज्येष्ठ पक्षी निरीक्षक
