ठाणे : मी स्वत: एक लोकप्रतिनिधी असून जनतेमध्ये आम्हाला जावे लागते. या अशा वाढत्या गुन्हेगारीमुळे माझी सुरक्षा धोक्यात आली आहे. माझ्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षा रक्षकही कमी केले आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचे काही झाल्यास त्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार राहतील असे पत्र ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना लिहिले आहे. सोमवारी हे पत्र ठाणे पोलिसांना दिले. ठाण्यातील गुन्हेगारांची परेड घेण्याची मागणी देखील त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार राजन विचारे हे ठाणे लोकसभेचे खासदार आहेत. तसेच ते ठाकरे गटाचे नेते आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना लिहिले आहे. डुंबरे यांची भेट घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी राजन विचारे ठाणे पोलीस आयुक्तालयात आले होते. परंतु डुंबरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे राजन विचारे यांनी हे पत्र सह आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांना दिले.

हेही वाचा – ठाणे : एअर गनने दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अ‍ॅमेझॉन कंपनीच्या संकेतस्थळावरून विकत घेतली होती गन

ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असून घटनाबाह्य सरकारकडून गुन्हेगारीला चालना मिळते का असे वाटू लागले आहे. सुडबुद्धीने कारवाई करणे, खोटे गुन्हे दाखल करणे, शाखा बळकावणे, धमक्या देणे असे प्रकार सध्याच्या सरकारच्या काळात वाढू लागले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ठाणे शहरात असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. १४ नोव्हेंबर २०२२ मध्ये श्रीनगर पोलीस ठाण्यात काही गुंडांनी ८ ते १० तास पोलीस ठाण्यामध्ये आम्हाला वेठीस धरले होते. त्यानंतर काही महिन्यांनी युवासेनेच्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ शाळकरी विद्यार्थ्याच्या पोटात चाकू भोसकून त्याला जखमी करण्यात आले होते. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. तर, दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. पुण्यात झालेला गोळीबार, वरिष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर झालेला हल्ला तसेच मुख्यमंत्री दररोज वेगवेगळ्या गुंडांसोबत छायाचित्र काढण्यात व्यस्त आहेत. पण गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलण्यात सरकार अपयशी ठरत आहे असे या पत्रात म्हटले आहे.

सध्या राज्यात गुंडांचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याची कबुल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एका वृत्तपत्राला दिली. पोलीस प्रशासन ही एक घटनात्मक व्यवस्था आहे. त्यामुळे ती संमत कायद्यानुसारच असायला हवी. अन्यथा राज्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. जे गुंड मोकाट फिरत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी पोलिसांनी एक पाऊल टाकून गुन्हेगारी प्रवृत्ती रोखावी अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण

मी स्वत: एक लोकप्रतिनिधी असून जनतेमध्ये आम्हाला जावे लागते. या अशा वाढत्या गुन्हेगारीमुळे माझी सुरक्षाही धोक्यात आली आहे. माझ्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षा रक्षकही आपण कमी केले आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचे काही झाल्यास त्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार राहतील असे विचारे यांनी पत्रात लिहीले आहे. पुण्यात नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील २६७ गुंडांची माध्यमांसमोर परेड घेऊन त्यांना समज दिली आहे. त्याप्रमाणे ठाण्यातही मोकाट फिरत असलेले कुख्यात गुंडांची परेड घ्यावी आणि गुन्हेगारांचा कायमस्वरूपी बीमोड करावा असेही विचारे यांनी पत्रात म्हटले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm and home minister responsible if anything happens to my life says mp rajan vichare ssb
Show comments