कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलावर पावसाच्या पाण्याचे तळे साचत असल्याने प्रवाशांना या पाण्यातून वाट काढत इच्छित स्थळी जावे लागते. या साचलेल्या पाण्याच्या बाजुला बारीक खडी, खराब झालेल्या सिमेंटच्या गोणी रचून ठेवण्यात आल्या आहेत. या गोण्यांंमुळे साचलेल्या पाण्याची वाट अडून राहत आहे.

सर्वाधिक वर्दळीच्या कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्कायवाॅकची ही अवस्था आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला की पावसाचे पाणी फुटलेल्या छतावरून स्कायवाॅकवरील पाऊल वाटेवर पडते. स्कायवाॅक पुलावर आलेले पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने ते तुंबून राहते. मागील काही दिवसांपासून स्कायवाॅकवर पाणी तुंबले आहे. या भागात डासांचा उपद्रव वाढला आहे. कल्याण, डोंबिवली शहरात एकूण ३२ डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहेत. साथ आजाराचे रूग्ण वाढत आहेत.

अशाही परिस्थितीत स्कायवाॅकवरील साचलेल्या पाण्याकडे पालिकच्या आरोग्य विभाग, क प्रभागातील कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेच्या क प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी, सफाई कामगार यांची या भागात येजा असते. त्यांना ही स्कायवाॅकवरील साचलेल्या पाण्याची माहिती वरिष्ठांना देता येत नाही का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत. अनेक दिवसांपासून स्कायवाॅकवर साचलेल्या या पाण्याने त्या भागात निसरडे झाले आहे. घाईत असलेला प्रवासी अनेक वेळा या पाण्यात पाय घसरून पडतो. अनेक प्रवासी या साचलेल्या पाण्यात जाऊ लागू नये म्हणून स्कायवाॅक खालील रस्त्याने इच्छित स्थळी जातो.

रस्ते मार्गाने जाताना प्रवाशांना वाहतूक कोंडी, चिखल यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुहेरी बाजुने कोंडी होत असल्याने प्रवासी प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे कल्याण रेल्वे स्थानक भागात सुरू आहेत. या भागात पालिका अधिकारी, अभियंत्यांची वर्दळ असते. स्कायवाॅकवर पाणी तुंबल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचीही त्यांना जाणीव होत नसल्याने पालिका कर्मचारी नक्की कोणत्या मानसिकतेत काम करतात, असे संतप्त प्रश्न प्रवाशांचे आहेत. प्रत्येकी वेळी नागरिकांनी तक्रार करायची, मग पालिका प्रशासन त्याची दखल घेणार का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

कल्याण रेल्वे स्थानक भागातील दररोजच्या वाहतूक कोंडीने प्रवासी अगोदरच हैराण आहेत. खड्ड्यांनी डोके वर काढल्याने त्याचाही उपद्रव प्रवाशांना होऊ लागला आहे. त्यामुळे या समस्यांच्या गर्तेतून आमची सुटका होणार कधी, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त, स्वच्छ ठेवणे, प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही असा ठेवणे हे रेल्वे बरोबर पालिका प्रशासनाचे काम आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे स्थानकाजवळील स्कायवाॅकवर पावसाच्या पाण्याचे तळे साचत असुनही त्यावर पालिका प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नाही हे आश्चर्यकारक आहे.

शैलेश राऊत अध्यक्ष, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना.