ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचे मोठे वेड असले तरी पुरेशा तयारीविना ते उराशी बाळगणे हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. एका मर्यादित काळापर्यंत परीक्षा देण्याबाबत विचार करायला हवा. यामध्ये जर अपयश आले तर करिअरबाबतीत दुसरा पर्याय तयार ठेवावा, असा मोलाचा सल्ला नवी मुंबई महानगरपलिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिला. करिअरसाठी कोणतेही क्षेत्र निवडले तरी वाचनाची आवड जोपासायलाच हवी, असे ते म्हणाले.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे शुक्रवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजन करण्यात आले होते. तिच्या उद्घाटनपर व्याख्यानात बांगर बोलत होते. या वेळी तासगावकर महाविद्यालयाचे डॉ. राजू सैरासे, आयटीएम महाविद्यालयाचे डॉ. संकल्प राव, विद्यालंकार इन्स्टिटय़ूटच्या जयश्री खंडेलवाल आणि गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे केयुकुमार नायक आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाला ठाणे आणि उपनगरातील विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

करिअरसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मार्गदर्शक पुढे आले आहेत; परंतु त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेलच याची शाश्वती नाही. सध्याच्या मुलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. तसेच करिअर कोणते निवडावे यासंबंधीही त्यांच्यासमोर अनेक पर्याय आहेत. त्यामुळे कोणी तरी सुचवले म्हणून स्पर्धा परीक्षांसारखा पर्याय निवडणे अयोग्य आहे, असे मत बांगर यांनी मांडले.

प्रशासकीय सेवेत काम करताना खूप अधिकार मिळतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टी जबाबदारीने पार पाडाव्या लागतात. तसेच सर्वसामान्य माणूस म्हणून कार्यरत राहण्यासाठी अधिकाऱ्यांनाही फार मेहनत घ्यावी लागते. अनेक जण प्रशासकीय सेवेला श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून पाहतात. ही विचारसरणी बदलायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. चार सत्रांच्या कार्यशाळेतील पहिल्या सत्रात ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांनी विद्यार्थ्यांना ‘स्पर्धा परीक्षांचे विश्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सामान्य ज्ञान महत्त्वाचे असून ते वाढविण्यासाठी नियमित वाचन करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

दुसऱ्या सत्रात समाजमाध्यम विश्लेषक आणि अभ्यासक केतन जोशी यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडिया आणि त्यातील संधींबाबत माहिती दिली. समाजमाध्यमे चालवणाऱ्या यंत्रणेचा योग्य पद्धतीने अभ्यास केला तर यात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. समाजमाध्यमांवर जाहिरात दाखविण्यासाठी काम करणारे समाजमाध्यम व्यवस्थापक ही त्यातलीच एक संधी आहे. तसेच विविध ‘सॉफ्टवेअर’चा वापर करत ‘फोटोशॉप’ करणे, मोठय़ा संस्थांचे जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून काम करणे तसेच सध्या विविध भाषांमध्ये समाजमाध्यमांवर लिखाणाच्या संधी उपलब्ध असल्याने करिअर घडविण्यासाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे जोशी यांनी सांगितले.

तिसऱ्या सत्रात मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी प्रात्यक्षिके दाखवत मानसिक आरोग्य कसे जपावे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत अडकून न राहता मनाचा वेध घेऊन योग्य करिअर निवडण्याचा सल्ला डॉ. बर्वे यांनी दिला. यानंतरच्या पुढील सत्रात बायोटेक्नॉलॉजी विषयातील तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांनी विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविध संधींविषयी माहिती दिली. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेतल्याने वैद्यकीय तसेच औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी आहेत. तसेच हे शिक्षण घेण्यासाठी राज्यात अनेक महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञानाकडे करिअर म्हणून पाहायला हवे, असे त्यांनी सांगितले.

आवडीच्या विषयामुळे हमखास यश : विवेक वेलणकर

‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या अखेरच्या सत्रात ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील ‘करिअर वाटा’ या विषयावर मार्गदर्शन केले. ज्या विषयात अभ्यास करायला आवडतो ते विषय घेऊन पुढचे शिक्षण घेतले तर नक्कीच यश मिळेल, असे मत वेलणकर मांडले. पदविका, अभियांत्रिकी, हॉटेल व्यवस्थापन आदींसारख्या विविध अभ्यासक्रमांची वेलणकर यांनी ओळख करून दिली. तसेच अभियांत्रिकीत सुमारे ७५ शाखा आहेत. यामुळे याची योग्य माहिती असल्यास अनेक संधी उपलब्ध होतात. यासाठी कोणकोणत्या प्रवेश परीक्षा देता येतील याबाबतही वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘वाचनाला पर्याय नाही’ विद्यार्थ्यांनीही वयाच्या १८ व्या वर्षांनंतर स्वत:हून कमाईचा मार्ग शोधावा. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पदव्युत्तर शिक्षण घेण्याकडे भर द्यावा. या सर्व गोष्टींमुळे आत्मविश्वास निर्माण होतो. त्याचबरोबर अभ्यासात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी वाचनाशिवाय गत्यंतर नाही, असा कानमंत्र अभिजीत बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आज काय?

मार्ग यशाचा या करिअर कार्यशाळेत आज आयपीएस रवींद्र शिसवे, विशेष पोलीस महानिरीक्षक (महाराष्ट्र राज्य मानवी आयोग, मुंबई) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा आणि संधी या विषयावर ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत मार्गदर्शन करतील. तर मेडिकल-इंजिनीअिरग आणि आर्ट्स, कॉमर्समधील करिअर वाटांविषयी करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर संवाद साधतील. मानसिक ताणतणावाचे नियोजन याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी बोलतील. तर बायोटेक्नॉलॉजी विषयातील संधींची माहिती या विषयातील तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक, डॉ. सिद्धिविनायक बर्वे देतील. समाजमाध्यमातल्या संधींविषयी  समीर आठल्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात ही कार्यशाळा होईल.