अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांना माती, चिखल, दगड, गोणपाट यांचीही चांगली ओळख असावी. निसर्गातील या वस्तूंमधून चांगल्या देखण्या कलाकृती तयार करू शकतो याची माहिती व्हावी, या उद्देशातून येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने गेल्या आठवड्यापासून ३५० विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेच्या आवारात २१ किल्ले बांधणीची कामे सुरू केली आहेत.
हेही वाचा >>>कल्याण मध्ये पतपेढीतून कर्ज मिळून देतो सांगून महिलेची १४ लाखाची फसवणूक
दुर्ग भ्रमण क्षेत्रातील ट्रेक क्षितिज संस्था या विद्यार्थ्यांना किल्ले उभारणीत मार्गदर्शन करत आहे.विद्यार्थी हौसेने या उपक्रमात सहभागी झाले आहेत. २१ विद्यार्थ्यांचे गट तयार करुन राज्याच्या विविध भागातील किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थी उभारणार आहेत. शाळेने विद्यार्थ्यांना माती, गोणपट, पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. शाळेचे शिक्षक, पदाधिकारी या उपक्रमात सहभागी होत आहेत.
किल्ल्यांच्या उभारणीनंतर किल्ल्यांवरील झाडे, दगड, पाषाण, मशाली, मावळे अशी देखणी रचना या प्रतिकृतींवर पाहण्यास मिळणार आहे. आकर्षक पध्दतीने या किल्ल्यांची रंगरचना विद्यार्थ्यांनी केली आहे.आताच्या पीढीला आपल्या इतिहासकालीन घटनांची माहिती असली पाहिजे. मोबाईल, महाजाल, समाज माध्यमांमध्ये अडकलेल्या मुलांना या तांत्रिक महाजालातून काही वेळ बाहेर काढावे. त्यांना आपला पूर्वइतिहास कृतीसह कळावा या उद्देशातून हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय संस्थेने घेतला, असे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी सांगितले.
२२ ऑक्टोबरपासून हे किल्ले प्रदर्शन डोंबिवलीतील नागरिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे, असे कार्यवाह अर्चना जोशी यांनी सांगितले.