ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून महापालिकेच्या लेखा विभागाकडून ५ लाख १० हजार २५१ रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना निवदेन देऊन तिघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदार कंपनीला तत्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांची दुरुस्तीच्या कामाचा ठेका जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना २०१७ मध्ये देण्यात आला होता. १ कोटी ७७ लाख ५२ हजार रुपयांचा ठेका होता. या ठेक्यासाठी कंपनीने महापालिकेत ५ लाख १० हजार २५१ रुपयांची अनामत रक्कम जमा केली होती. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनवणे, उप अभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अनामत रक्कम काढून घेण्यात आली आहे.

हेही वाचा…कल्याण शहरातील २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास वाहतूक विभागाकडून प्रतिबंध

याप्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेने चौकशी केली. यामध्ये या स्वाक्षऱ्या अजित सिंग, अभिषेक सिंग आणि संतोष पवार यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा वाघुले यांनी केला आहे. जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. तसेच लेखा व वित्त विभागाने १७ ऑगस्ट रोजी बनावट स्वाक्षऱ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर तक्रार दाखल करण्याचे सुचविले आहे. परंतु पाच महिन्यानंतरही महापालिकेकडून कारवाई झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.