रविवारी सर्वाधिक म्हणजेच ६३८ रुग्णांची नोंद
ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. यापूर्वी शहरात ५५५ सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची नोंद होती. मात्र, त्याहून अधिक म्हणजेच ६३८ रुग्ण रविवारी दिवसभरात शहरात आढळून आले असून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या असल्याचे समोर आले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने रुग्णांच्या उपचारासाठी ४ हजारांहून अधिक खाटांची व्यवस्था निर्माण केली आहे. त्याचबरोबर ताप तपासणी मोहीम, संशयित रुग्णांचा शोध घेणे, शहर स्वच्छता आणि करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ६८ हजार ८५२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६३ हजार २०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १ हजार ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ४ हजार २८७ रुग्ण उपचार घेत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत रुग्णसंख्या कमी झाली होती. या काळात सरासरी ८० ते १५० रुग्ण आढळून येत होते. तर मार्च महिन्यात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या काही दिवसांपासून तीनशे ते पाचशे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. त्यातच रविवारी दिवसभरात ६३८ रुग्ण शहरात आढळून आले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्ण संख्या असल्याची नोंद झाली आहे. तर दिवसाला दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पालिका यंत्रणा सज्ज केली आहे.
शहरात ४२२१ खाटांची व्यवस्था
ठाणे शहरात पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांच्या उपचारासाठी ४२२१ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या करोना रुग्णालयात १०७५, विराज रुग्णालयात ३०, स्वयम् रुग्णालयात ३०, ठाणे हेल्थ केअरमध्ये ५३, मेट्रो पोल मल्टिस्पेशालिटी रुग्णालयामध्ये ६०, टायटन रुग्णालयामध्ये ६०, कौशल्य रुग्णालयामध्ये १००, वेदांत रुग्णालयामध्ये १२५, सफायर रुग्णालयामध्ये १४२, बेथनी रुग्णालयामध्ये १९०, हायलँड सुपरस्पेशालिटी रुग्णालयामध्ये ५०, एकता रुग्णालयामध्ये २५, विराज रुग्णालयामध्ये ३०, कैझेने सुपरस्पेशालिटी रुग्णालयामध्ये ५०, वेदांत मल्टीस्पेशलिटी रुग्णालय अॅण्ड रिसर्च सेंटर येथे ४५, वेदांत एक्सटेंशन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय ८५ , होरायझन प्राइम रुग्णालयामध्ये १००, ठाणे नोबल रुग्णालयामध्ये ३०, ज्युपिटर रुग्णालयाजवळील पार्किंग प्लाझा येथे ११८१ आणि महापालिकेच्या लोढा भायंदरपाडा येथे ७६० खाटांचा समावेश आहे.
शहरातील करोनाबाधित
४२८७ ठाणे शहरातील सक्रिय रुग्ण
९६३ लक्षणे असलेले रुग्ण
३१५३ लक्षणे नसलेले रुग्ण
१२४३ महापालिका रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण
२८६२ घरीच उपचार घेणारे रुग्ण
१८२ खासगी रुग्णालयात उपचार घेणारे
