डोंबिवली – डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावर कचोरे टेकडीवर पावसाळ्यात भूस्खलन होऊन जीवित, वित्त हानी होऊ शकते हे माहिती असुनही पालिका प्रशासनाला अंधारात ठेऊन कचोरे टेकडीवर दोन भूमाफियांनी बेकायदा चाळ उभारली. त्यानंतर ही चाळ गेल्या महिन्यात पाऊस सुरू असताना अचानक खचली. या चाळीचा पाठीमागील भाग कोसळला. यामध्ये सहा घरांचे नुकसान झाले. या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार धरून फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही बेकायदा चाळ उभारणाऱ्या भूमाफियांवर टिळकनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना आणि नियोजन (एमआरटीपी) कायद्याने तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, अधीक्षक जयवंत चौधरी यांनी वरिष्ठांच्या निर्देशावरून गणेश जयराम भोईर, गणेश शंकर मुकादम यांच्या विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात बेकायदा चाळ बांधल्याची तक्रार केली. पोलिसांनी अधीक्षक चौधरी यांच्या तक्रारीवरून एमआरटीपीचा गुन्हा या दोघांवर दाखल केला आहे.
अधीक्षक जयवंत चौधरी यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की कचोरे टेकडीवर खोदकाम करून बेकायदा बांधकामांची उभारणी केली की अनेक वेळा ही बांधकामे पावसाळ्यात भुसभुशीत होऊन कोसळतात. हे माहिती असुनही गणेश भोईर, गणेश मुकादम यांनी आपल्या कब्जे वहिवाटीच्या चार ते पाच गुंठे जमिनीवर सहा खोल्यांची बेकायदा चाळ बांधली. ही जमीन सरकारी की खासगी हे जमीन मोजणी केल्यानंतर निश्चित होणार आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
फ आणि जे प्रभागाच्या हद्दीवर ही जमीन आहे. गेल्या महिन्यात सकाळच्या वेळेत या बेकायदा चाळीचा भाग पावसामुळे भुसभुशीत झाल्याने खचला आणि त्यानंतर या चाळीच्या सहा खोल्यांचा पाठीमागील भाग कोसळला. या चाळीच्या आधार भिंतीला तडे गेले आहेत, त्यामुळे रहिवाशांनी याठिकाणी राहू नये, अशा सूचना पाऊस सुरू होण्यापूर्वी साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी रहिवाशांना मे मध्ये पाहणी दौऱ्याच्या वेळी सूचित केले होते. त्याप्रमाणे रहिवासी अगोदरच या चाळीतून अन्य भागात निवास करण्यासाठी गेले होते. चाळीचा मागील भाग कोसळला त्यावेळी जीवितहानी झाली नाही.
कचोरे प्रभागाच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांनीही या चाळीला निर्माण झालेला धोका ओळखून रहिवाशांना अन्यत्र जाण्याच्या सूचना केल्या होत्या.
जुलैमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना सकाळच्या वेळेत भोईर, मुकादम यांनी बांधलेल्या बेकायदा चाळीचा भाग आधार भिंतीचा भाग खचताच कोसळला. टेकडीवर खोदकाम करून दगड, विटांचा वापर करून पक्के बेकायदा बांधकाम केले. म्हणून पालिकेच्या फ प्रभागाने या दोन्ही भूमाफियांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले आहेत. फ प्रभागात एकही बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची काळजी फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्याकडून घेतली जात आहे.