संत तुकारामपासून चार्वाकापर्यंत आणि सफदर हाश्मीपासून पाश यांच्यापर्यंत संवेदनशील कलाकृती करणाऱ्यांबाबत व्यवस्था नेहमीच असंवेदनशील राहिली. सध्या देशातील वातावरणातही हळूहळू तसाच सूर घुमू लागला आहे. विशेषत: तरुणवर्ग समाजातील असंवेदनशीलतेबाबत अधिक जागरूक आहे. सध्याच्या युवा रंगकर्मीनाही अशा वास्तवाचे चटके अधूनमधून बसत असतात. हृषिकेश कोळी याच्या ‘मुस्काट’ या दीर्घाकातून हाच अनुभव रंगमंचावर मांडण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे एखाद्या गंभीर अपराधाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया, घटनेची चिकित्सा आणि या साऱ्यांतून निर्माण होणारे ‘त्रयस्थ’ वास्तव प्रदीप वैद्य लिखित ‘ती आणि आपण’ हा दीर्घाक पुरेपूर मांडतो. समाजाच्या संवेदनशीलतेला साद घालणारे हे दीर्घाक पाहण्याची संधी ठाणेकरांना चालून आली आहे. अमोल भोर, साईनाथ गनुवाड या तरुणांनी दिग्दर्शित हे दोन ‘जाणिवांचा जागर’ करणारे दीर्घाक प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.
कधी- रविवार, २० मार्च, वेळ- सकाळी ११ वाजता.
कुठे- गडकरी रंगायतन, ठाणे (प.).
शिवतीर्थाचे छायादर्शन
एका विषयाला धरून छायाचित्रण करणे, ही तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी बरेच संशोधन आणि भटकंती करावी लागते. मात्र तरीही छायाचित्रकार या कामी मागे राहात नाही. आपल्या छायाचित्रांतून वेगवेगळे विषय समाजासमोर मांडण्याची त्यांची तळमळ त्यांना शांत बसूच देत नाही. यात हौशी छायाचित्रकारही आलेच. असेच एक छायाचित्रकार विनोद पटेल यांनी शिव हा विषय आपल्या छायाचित्रणासाठी निवडला आणि देशभरातील शिवशंकराच्या प्रतिमा कॅमेऱ्यात बद्ध करण्यासाठी भटकंती सुरू केली. देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणची तीर्थक्षेत्रे, शिवमंदिरे आणि शिवलिंगांची छायाचित्रे पटेल यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. या छायाचित्रांचेच प्रदर्शन येत्या रविवारी ठाणेकरांना पाहता येणार आहे. ‘फोटो सर्कल सोसायटी’च्या वतीने पटेल यांच्या छायाचित्रांचे स्लाइड शो येथे दिसणार आहेत.
कधी- रविवार २० मार्च, सायं. ५.३० वाजता.
कुठे- ठाणे कलाभवन, कापूरबावडी ठाणे (प.).
ऋजुता दिवेकरांकडून फिटनेसचे फंडे
वजन आणि शरीर सौंदर्याच्या बाबत सर्वच मंडळी जागृत असतात, परंतु नेमके काय खावे किंवा काय खाऊ नये याबाबतीत संपूर्ण ज्ञान नसल्याने लठ्ठपणा उद्भवतो. यावर तोडगा काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणेतर्फे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे ‘रिमूव द वेस्ट टू टोन युअर वेस्ट’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १९ मार्च रोजी काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. ऋजुता दिवेकर हे एक अतिशय प्रभावशाली आणि नावाजलेले व्यक्तिमत्त्व असून त्या भारताच्या नं. १ सेलिब्रिटी न्युट्रिषनिस्ट (पोषकतज्ज्ञ) म्हणून ओळखल्या जातात. हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ ठाणेने खास युवा पिढीला लक्षात ठेवून आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
कधी- शनिवार, १९ मार्च, वेळ- सकाळी ११ ते दुपारी १.
कुठे- डॉ. काशिनाश घाणेकर नाटय़गृह, हिरानंदानी मेडॉजजवळ, ठाणे (प.).
फॅशनच्या दुनियेतील छायचित्रण कला
फॅशनचे युग स्पर्धेचे आणि आव्हानात्मक असले तरी तरुणाईला त्याबद्दल विशेष आकर्षण आहे. फॅशनच्या दुनियेतील झगमगाट त्यांना खुणावत असतो.या क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करण्याचे क्षेत्र म्हणजे छायाचित्र. फॅशनेबल मॉडेल्सचे चेहरे कॅमेऱ्यात टिपत फॅशन छायाचित्रकार मोठे होतात. फॅशन क्षेत्रात करिअर करूइच्छिणाऱ्या तरुणांसाठी ‘बिग आर्ट इन्स्टिटय़ूट’तर्फे मोफत फॅशन छायाचित्र आणि फाइन आर्ट छायाचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत अॅनिमेशन, फिल्म, डिझाइन, इव्हेन्ट्स यांचे छायाचित्र करता येऊ शकते याचे मार्गदर्शन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९९३०४९४५११, ९९३०८०४५२२.
कधी- १९ आणि २० मार्च, वेळ- दुपारी ३ ते ६.
कुठे- टाऊन हॉल, ठाणे.
साल्सा नृत्यधारा..
युवा पिढीचा नृत्याबद्दलचा नवा कल पाहता, आता ठाण्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. अभिनेता नकुल घाणेकर यांच्या डिफरेन्ट डान्स स्ट्रोक या संस्थेतर्फे येथील लेरिडा या तारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी ‘साल्सा नाइट’चे आयोजन करण्यात आले आहे. फिटनेस राखण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या नृत्य प्रकारात याचा मोठा प्रमाणावर उपयोग केला जातो. असे असताना शुक्रवारी रात्री ठाण्यात ‘साल्सा नाइट’ आयोजित करून लेरिडाच्या व्यवस्थापनाने तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांसाठी रात्री ८.४५ ते ९ या वेळेत प्रवेश मोफत आहे.
कधी- शुक्रवार, १८ मार्च.
कुठे- १ला मजला, हॉटेल लेरिडा, ज्युपिटर हॉस्पिटलसमोर, ठाणे (प.).
ठाण्यातील संगीत कलाकारांची ‘युनिटी’
ठाण्यातील संगीत कलावंतांना एकत्र आणून त्यांच्या कलेचा आस्वाद ठाणेकर रसिकांना देण्यासाठी ठाणे म्युझिक फोरमच्या वतीने ‘युनिटी २०१६’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० मार्च या कालावधीत सहयोग मंदिर सभागृहात सायंकाळी ५.३० ते १० या वेळेत हे संमेलन रंगणार आहे. ठाण्यातील चाळीसहून अधिक कलावंत या कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहे. ठाण्यातील कलाकारांना एकाच व्यासपीठावरून आपली कला सादर करण्याची संधी ठाणे म्युझिक फोरमने ठाण्यातील नवोदित आणि नामांकित कलाकारांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरूकेला आहे. यंदा या कार्यक्रमाचे चौथे वर्ष असून त्यामध्ये ४०हून अधिक कलाकार गायक, वादक मिळून कला आविष्कार सादर करणार आहेत. शुक्रवार, १८ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता वाद्यकलाकारांची ‘जुगलबंदी’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता सर्वाच्या मनामनावर राज्य करणाऱ्या अशा काही खास गझलांचा नजराणा ‘शाम-ए-गझल’ या कार्यक्रमातून सादर करण्यात येणार आहे. तसेच रविवार, २० मार्च रोजी सकाळी ९ वाजता मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरेल बंदिशींचा कार्यक्रम या वेळी ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. यामध्ये विभावरी बांधवकर, कल्याणी साळुंके , हेमा उपासनी, स्वरांगी मराठे, रोहित धारप, दीपिका भिडे, निषाद बाक्रे, अपूर्वा गोखले, मंदार वाळुंजकर, पूजा बाक्रे, प्रदीप चिटणीस, किशोर पांडे, पुष्कर जोशी, सुप्रिया जोशी, अनंत जोशी, उत्पल दत्त, वेदश्री ओक, श्रीया सोंडूर, वरदा गोडबोले, नूपुर काशिद, प्राजक्ता जोशी, हर्षां भावे, शेखर राजे, मोहन पेंडसे, आदित्य ओक, आदित्य पानवलकर, केवल कावले, प्रकाश चिटणीस हे कलाकार सहभागी होणार आहेत.
कधी- १८ ते २० मार्च.
कुठे- पहिला मजला, सहयोग मंदिर, घंटाळी पथ, ठाणे (प.).
तालासुरांच्या साथीने नववधू कविता
शब्द आणि सूर-तालातून व्यक्त होण्याकडे नवीन पिढीचा अधिक कल दिसतो. शब्दांनी सजवलेल्या कवितेने नेहमीच नवयुवतीचे रूप धारण केल्यासारखे दिसते, मात्र त्या कवितेला ताला-सुराचे ज्ञान प्राप्त झाले तर ती कविता एखाद्या नववधूसारखीच सजलेली दिसते. ही कविता आयुष्य, समाज याच्यावर भाष्य करताना दिसते. परंतु या नवोदित कलाकारांच्या कवितेतील शब्दही जणू काही जुन्या पिढीच्या कलाकार आणि नवोदित कलाकारांच्या शब्दांनी शालू पांघरतात. हाच अनुभव २० मार्च रोजी ‘रे सख्या’ या वर्षपूर्ती कार्यक्रमात डोंबिवलीकर रसिकांना घेता येणार आहे. केतन पटवर्धन, मयूरेश साने, अमेय ठाकूरदेसाई, अक्षय कावळे, आशुतोष दंडगे हे कलाकर आपली कला सादर करतील. या कार्यक्रमात गीतकार वैभव जोशी आणि संगीत संयोजक कमलेश भडकमकर हे उपस्थित राहणार आहेत.
कधी- रविवार, २० मार्च रोजी, सायं. ६ वाजता.
कुठे- शुभमंगल हॉल, डोंबिवली (पू.).
गोखले दाम्पत्याच्या साथीने शब्दांची धुळवड
शब्द नेहमीच संवादाचे काम करत असतात. पण हेच शब्द कधी तरी मुलायम बनून प्रेमाची बरसात करतात तर कधी तरी धारदार बाण होऊन एखाद्याच्या हृदयात शिरतात. शब्दांचे हे वेगवेगळे रंग भूतलावावर असणाऱ्या नऊरसांच्या रंगाची उधळण करतात आणि त्यानंतर आजूबाजूचे वातावरणही त्या रसामध्ये न्हाऊन निघते. शब्दांना शब्दांचीच साथसोबत असली की तेही आपल्या विश्वात अगदी सहज रमतात आणि रसिकांनाही रमायला अलगद भाग पाडतात. आणि म्हणूनच वसंतोत्सवाची चाहूल लागत असतानाच शब्दांनी सजलेल्या चारोळ्यांचाही वसंत कसा फुलतो हे चंद्रशेखर गोखले यांच्या शब्दांतून कल्याणकरांना अनुभवता येणार आहे. सर्व ब्राह्मण कट्टा यांच्यावतीने २० मार्च रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात चंद्रशेखर गोखले आणि त्यांच्या पत्नी उमा गोखले यांच्याशी गप्पा मारण्याची संधीही मिळणार आहे.
क धी- २० मार्च रोजी, वेळ- सायंकाळी ६ ते ८ वाजता.
कुठे- ओक हायस्कू ल, दत्त आळी, कल्याण (प.).
उत्सव चांगुलपणाचा..
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक माहिती संकलनाची चळवळ उभारणाऱ्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचा सहावा वर्धापन दिन ‘उत्सव चांगुलपणाचा’ या कार्यक्रमाने ठाण्यात साजरा होत आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील चौदाशे देवरायांचा अभ्यास करणारे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये, थॅलिसिमिया या दुर्मीळ रोगाने ग्रस्त असलेल्या लहान मुलांना आधार देण्याचे काम करणाऱ्या सुजाता रायकर आणि अडीच हजार शेतकऱ्यांच्या सहभागातून कोटय़वधींची उलाढाल करणारी कंपनी उभारणारे नाशिकचे शेतकरी विलास शिंदे यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
कधी- शनिवारी, १९ मार्च, वेळ- सायंकाळी ६ वाजता.
कुठे- दुसरा मजला, सहयोग मंदिर, नौपाडा, ठाणे(प.).
खाडय़ांचे सौंदर्य दर्शन
खाडीचे सौंदर्य टिकून राहावे व त्याबाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी ठाणे महानगरपालिका व पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे खाडी जैवविविधता छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पक्षी, मासे, कीटक, फुलपाखरे, साप, प्राणी व इतर जैवविविधतेचे दर्शन या छायाचित्रांच्या माध्यमातून ठाणेकरांना घडणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
कधी- १८ ते २० मार्च, वेळ- सकाळी १० ते रात्री ८.
कुठे- ठाणे कलाभवन, कापुरबावडी नाका, बिग बाजारजवळ, ठाणे (प.).
या सदरासाठी आपल्या कार्यक्रमांची माहिती lsthane2016@gmail.com या पत्त्यावर ई-मेल करा.