कल्याण – टिटवाळा- वासिंद रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सोमवारी रात्री दोन वाजता कसारा दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादावादीतून शहापूर जवळील साजिवली गावातील दत्तात्रय भोईर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या हल्ल्यात मयत दत्तात्रय भोईर यांचे एक सहकारी प्रदीप शिरोसे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील दोन आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. दोन जण फरार आहेत. तनुज जुमवाल, अमोल परदेशी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – कल्याण डोंबिवलीतील वृक्ष विद्युत रोषणाई मुक्त

पोलिसांनी सांंगितले, दत्तात्रय भोईर आणि प्रदीप शिरोसे हे उल्हासनगर येथे आपल्या मित्राच्या हळदी समारंंभासाठी सोमवारी आले होते. घरी जाण्यासाठी त्यांनी उल्हासनगर रेल्वे स्थानकात रात्री दोन वाजताच्या दरम्यान येणारी कसारा लोकल पकडली. मयत दत्तात्रय आणि प्रदीप आणि इतर प्रवासी एका बाकड्यावर बसून एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते. यावेळी या प्रवाशांच्या समोर मद्य सेवन करून जवळ चाकू असलेल्या तरुणांचा गट बसला होता. दत्तात्रय भोईर हे आपल्याकडे बघून हसतात आणि आपलीच चेष्टा करतात असा गैरसमज करून आरोपी अमोल परदेशी याने दत्तात्रय यांना जाब विचारला. आपण तुम्हाला काही बोललेलोच नाही, असे सांगून भोईर यांनी अमोलला शांत राहण्याचा सल्ला दिला. अमोल, त्याचे इतर तीन साथीदार यांनी मद्य आणि अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याने ते भोईर आणि शिरोसे यांच्याशी भांडण उकरून काढून त्यांना शिवीगाळ करत होते. इतर प्रवासी आरोपींना शांत करत होते.

हेही वाचा – ठाणे: सहस्त्रपती स्पर्धक; अब्जाधीश उमेदवारांसमोर अपक्ष, छोट्या पक्षांच्या उमेदवारांचे आव्हान

मद्याच्या गुंगीत असलेल्या चारही आरोपींनी अचानक दत्तात्रय भोईर यांना बेदम मारहाण सुरू केली. त्यांना पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एका आरोपीने दत्तात्रय यांच्यावर चाकूचे वार करून त्यांना गंभीर जखमी केले. टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आरोपींनी डब्यात धुमाकूळ घातला होता. इतर प्रवाशांना ते चाकूचा धाक दाखवून त्यांना डब्यातून बाहेर लोटून देण्याची धमकी देत होते. खडवली रेल्वे स्थानक येताच डब्यातील सर्व प्रवाशांनी दोन आरोपींना पकडून रेल्वे सुरक्षा जवानांच्या ताब्यात दिले. इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला आहे. रात्रीच्या वेळेत कल्याण ते कसारा, कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करताना गर्दुल्ले, मद्यपी यांची संख्या वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.