Death trap on lakes in Thane- ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र या शहरातील तलाव आणि खाडी मृत्यूचा सापळा बनले आहे. मागील अकरा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत शहरातील विविध तलाव आणि खाड्यांमध्ये अकरा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून समोर आली आहे. यामध्ये आत्महत्या करणे, आत्महत्येचा प्रयत्न, पोहताना बुडणे, तोल जाऊन पाण्यात पडणे अशा विविध स्वरूपातील घटनांचा समावेश आहे.
तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे ठाणे हे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. उपवन तलाव, राम मंदिर तलाव, आंबे घोसाळे तलाव, कोळशेत खाडी, गाईमुख, रेतीबंदर खाडी असे अनेक तलाव आणि खाडी या शहराला वेगळी ओळख देतात. मात्र गेल्या काही वर्षांत या जलाशयांचे सौंदर्य मृत्यूच्या सावटाखाली गेले आहे. ठाण्यातील तलाव आणि खाड्यांमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये सातत्याने वाढत आहेत. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तब्बल ११ जणांचा मृत्यू तलाव आणि खाड्यांमध्ये झाल्याचे समजते. यामध्ये उपवन तलाव, मुंब्रा खाडी, कशेळी खाडी, कळवा, राम मंदिर तलाव, रायलादेवी तलाव, रेती बंदर खाडी, वाघबीळ खाडी, आंबे घोसाळे तलाव या ठिकाणांचा समावेश आहे.
अशा आहेत घटना
जानेवारी महिन्यात अंदाजे वय ८५ वर्षीय महिला साकेत पुलाच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलावरून पलीकडे जात असताना तोल जाऊन कळवा खाडीत पडल्याची घटना घडली होती. तसेच एप्रिल महिन्यात रायलादेवी तलावात १८ वर्षीय मुलगा पोहण्यासाठी गेला होता. त्या मुलाला पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात कशेळी खाडीमध्ये ५३ वर्षीय पुरूषाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी काल्हेर परिसरात सापडला होता. सप्टेंबरमध्ये १९ वर्षीय मुलगा मुलुंड ते कळवा रेल्वे गाडीने प्रवास करत होता. रेल्वे गाडी विटावा पुलावर येताच त्यामुलाचा तोल गेला आणि त्याचा खाडीमध्ये पडून मृत्यू झाला. त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये ४३ वर्षाच्या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्यक्तीला कशेळी खाडीमध्ये फेकून देण्यात आले होते. ऑक्टोबर मध्ये एका कार चालकाने कशेळी पुलावर गाडी उभी करून खाडीमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. नोव्हेंबर मध्ये उपवन तलावात ५८ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला.
