डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील ६५ महारेरा प्रकरणातील एका बेकायदा इमारत विकासकाने स्वताहून पाडण्यास सुरूवात केली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाने गेल्या वर्षी या बेकायदा इमारतीला इमारत स्वताहून रिकामी करणे आणि तोडून घेण्याची नोटीस बजावली होती. या नोटिसीप्रमाणे विकासकाने पालिकेचा तोडकामाचा आर्थिक खर्चाचा बोजा पडण्यापेक्षा स्वताहून ही इमारत तोडण्यास सुरूवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महारेरा प्रकरणातील स्वताहून बांधकामधारकाने तोडण्यास घेतलेली ही पहिलीच बेकायदा इमारत आहे. ५८ बेकायदा इमारती तोडण्यासाठी पालिकेकडे आता फक्त एक महिन्याचा अवधी आहे. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी सांगितले, दत्तनगरमध्ये दिवंगत राजेंद्र कांबळे यांच्या कब्जा वहिवाटीच्या जमिनीवर चार वर्षापूर्वी बांधकामकारक प्रफुल्ल गोरे यांनी एका सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती. ही इमारत उभारताना कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या, या बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराचा नोंदणी क्रमांक या बेकायदा इमारतीला मिळवला होता.

हेही वाचा…कल्याणमध्ये पोलिसांच्या वाहनातून पळालेल्या आरोपीला उल्हासनगरमधून अटक

ही इमारत बेकायदा असल्याने आणि या इमारत सामान्य नागरिकांची घर खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता विचारात घेऊन निर्भय बनो संस्थेचे संस्थापक महेश निंबाळकर यांनी पालिकेकडे अनेक तक्रारी करून या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ग प्रभागाने यापूर्वी दोन वेळा या बेकायदा इमारतीवर कारवाई केली होती. ही इमारत भुईसपाट न केल्याने या इमारतीत नागरिकांचा वावर होता.

उच्च न्यायालयाने ६५ महारेरा प्रकरणातील डोंबिवलीतील बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी गेल्या वर्षी या इमारतीच्या जमीन मालकाला, रहिवासी, व्यावसायिकांना इमारत दहा दिवसात रिकामी करून देण्याच्या आणि स्वताहून ही इमारत तोडून घेण्याचे आदेश दिले होते. ही बेकायदा इमारत उभारणारे बांधकामधारक प्रफुल्ल गोरे यांनी पालिकेला स्वताहून ही इमारत तोडून घेत असल्याचे कळविले. या इमारतीला चारही बाजुने पडदे लावून ही इमारत क्रॅकरच्या साहाय्याने भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. ही इमारत पालिकेने तोडली असती तर पालिकेकडून तोडकामाचा खर्चाचा बोजा विकासकाकडून वसूल करण्यात आला असता.

हेही वाचा…डोंबिवलीत सुभाष रस्त्यावर झाड कोसळुन दुचाकींचा चुराडा

बांधकामधारक प्रफुल्ल गोरे यांच्या डोंबिवली पश्चिमेतील बेकायदा इमारतींचा पाणी, वीज पुरवठा खंडित करावा. या इमारतींवर तोडकामाची कारवाई करावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर पालिका आयुक्त, विष्णुनगर पोलिसांकडे पाठपुरावा करत आहेत.

दत्तनगरमधील महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारत बांधकामधारकाने स्वताहून तोडण्याची तयारी दर्शवली. दहा दिवसात ही इमारत बांधकामधारक स्वताहून तोडून घेणार आहे. या तोडकामावर पालिकेचे लक्ष आहे. संजयकुमार कुमावत साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Developer has started demolition of illegal building in 65 maharera case in dattanagar dombivli east sud 02