जि. प. कडून शाळा ‘कडोंमपा’कडे हस्तांतरित झाल्या नसल्याने पेच
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळांचे नियंत्रण अद्याप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली आहे. २७ गावे पालिका हद्दीत समाविष्ट होऊन दोन वर्षे लोटल्यानंतरही या गावांमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा पालिकेकडे हस्तांतरित झाल्याची अधिसूचना शासनाने काढलेली नाही. या गावांच्या हद्दीतील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
१४ मे २०१५ मध्ये शासनाने २७ गावे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समाविष्ट करीत असल्याची अधिसूचना (नोटिफिकेशन) प्रसिद्ध केली. त्यानुसार पालिकेने २७ गावांमध्ये कामकाज सुरू केले. गावांप्रमाणेच शासनाने तातडीने २७ गावांमधील जिल्हा परिषद, माध्यमिक शाळांचे (इ. १ ली ते १२ वी) नियंत्रण पालिकेकडे देण्याची अधिसूचना काढणे आवश्यक होते. ही अधिसूचना दोन वर्षे उलटली तरी शासनाने न काढल्याने या गावांमधील शाळांचे नियंत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली या शाळांचा कारभार सुरू आहे. या शाळांचे सर्व दप्तर अद्याप कल्याण पंचायत समितीकडे आहे. त्याचा ताबा पालिकेला मिळालेला नाही, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
२७ गावांमधील शाळा पालिकेच्या अखत्यारीत नाहीत. त्यामुळे गावांमधील शाळांतील मुलांचा सहभाग ठाणे जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये करून घ्यावा, अशी मागणी पालिकेच्या क्रीडा विभागाने जिल्हा क्रीडा विभागाकडे केली आहे. गेल्या वर्षी पालिका क्रीडा विभागाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून कल्याण डोंबिवलीत जिल्हा क्रीडा स्पर्धा घेतल्या होत्या. या स्पर्धांमध्ये पालिका हद्दीतील शहरी भागातील व २७ गावांमधील शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मात्र, केवळ तोंडी आदेशावरून अशा स्पर्धा खेळवणे कायदेशीरदृष्टय़ा योग्य नसल्याची भूमिका यंदा पालिकेच्या क्रीडा विभागाने घेतली आहे. पावसाळी जिल्हा क्रीडा स्पर्धा लवकरच सुरू होतील. त्यावेळी २७ गावांमधील मुलांना पालिका की ठाणे जिल्हा क्रीडा विभागातून खेळवायचे असा मोठा पेच शाळांसमोर निर्माण झाला आहे.
२७ गावांमधील शाळांमधील शिक्षकांना जिल्हा क्रीडा स्पर्धांबाबत ठाणे जिल्हा क्रीडा विभागाने प्रशिक्षण दिले आहे. २७ गावांतील शाळा जि. प.च्या ताब्यात असल्याने २७ गावांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना ठाणे जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घ्यावे, असे पत्र जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पालिकेकडून पाठविण्यात आले आहे.
सुरेश पवार, उपायुक्त, क्रीडा विभाग, कडोंमपा
२७ गावांमधील विद्यार्थ्यांना पालिका क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यास तयार नसेल तर, खेळाडू विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना ठाणे जिल्हा क्रीडा विभागाकडून खेळविण्यात येईल. पालिका तयार झाली तर त्यांना पालिका स्पर्धांमधून खेळविले जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. याबाबत जिल्हा क्रीडा विभागाशी संपर्क करून योग्य सूचना देतो.’
–एन. डी. मोटे, उपसंचालक, क्रीडा व युवक विभाग