डोंबिवली : डोंबिवलीतील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेने आयोजित केलेल्या ज्ञान कौशल्य प्रदर्शनात शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी ७०२ विविध प्रकारचे प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांची अंगभूत कौशल्ये विकसित व्हावीत, त्यांच्या कौशल्य गुणांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या विचारातून आयोजित केलेल्या या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी तन्मयतेने तयार केलेल्या काही विज्ञान प्रयोगांना स्वामीत्व हक्क (पेटंट) मिळतील का, यादृष्टीने ब्लाॅसम शाळा व्यवस्थापन प्रयत्न करणार आहे.

ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी या नाॅलेज फेअर प्रदर्शनात सहभागी झाले होते. हे प्रदर्शन भरवण्यापूर्वी ब्लाॅसम शाळेच्या प्राचार्या नीलजा पाटील, उपप्राचार्या तृप्ती तौमर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गांमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक विद्याथ्यार्ची अंगभूत कौशल्य काय आहेत. त्या विद्यार्थ्याची विज्ञान प्रयोगातील आवड हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिनाभर हा उपक्रम शाळेत सुरू होता.

महिनाभराच्या या प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या सांगितलेल्या विषयांचे विज्ञान, क्रीडा, संगीत, भाषा, गणितीय कौशल्य, रोबोटिक्स, पर्यावरण, अवकाश प्रगती, वातावरण, शेती, माहिती आणि तंत्रज्ञानातील भारताची झेप, खेळ, चित्रकला, हस्तकला प्रयोग करण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या सामर्थ्याने अंगभूत कौशल्यातून विविध ७०२ प्रकल्प ज्ञान कौशल्य प्रदर्शनात सादर केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. राजीव मिश्रा यांच्या हस्ते झाले. संस्था अध्यक्ष डाॅ. उल्हास कोल्हटर, विश्वस्त संजीव कानिटकर, प्रदीप गोसावी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमधील कौशल्ये विकसित होणे खूप गरजेचे आहे. क्रमिक अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे कौशल्य, कलागुण विकसित करण्यासाठी शाळांनी सर्वाधिक पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळेने व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आपण एकदा चांगले काही करू शकतो, याची जाणीव झाली की हेच विद्यार्थी स्वतामधील जाणिवा विकसित करतात. हेच उद्याचे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक असतात, असे प्रा. मिश्रा यांनी सांगितले.

आपण संशोधनात पुढे आहोत, पण स्वामीत्व हक्क घेण्यासाठीही आपण आग्रही राहिले पाहिजे असे सांगितले. ब्लाॅसम शाळेच्या या प्रदर्शनातील काही प्रकल्प खूप कौतुकास्पद आहेत. अशा प्रयोगांच्या स्वामीत्व हक्कासाठी आपण प्रयत्न करू शकतो, असा शब्द प्रा. मिश्रा यांनी ब्लाॅसम शाळा व्यवस्थापनाला दिला. आणि दरवर्षी भरणाऱ्या या प्रदर्शनातील प्रयोगांची विदा (डेटा) संकलित करून ठेवण्याची सूचना केली.

कठोर मेहनत, प्रखर निरीक्षण शक्ती या विचारातून वाटचाल केली की विज्ञान प्रगतीच्या वाटा खुल्या होतात, असे डाॅ. कोल्हटकर यांनी सांगितले. प्रा. मिश्रा यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे ब्लाॅसम शाळा व्यवस्थापनाने नाॅलेज फेअर प्रदर्शनातील काही विज्ञान प्रयोगांना पेटंट मिळविता येतील का यादृष्टीने विचार सुरू केला आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आपल्या प्रयोगाला स्वामीत्व हक्क मिळाला याची जाणीव झाली तर हेच विद्यार्थी उद्याचे देशातील उच्च पराकोटीचे शास्त्रज्ञ आणि आधारस्तंभ असतील, असे डाॅ. कोल्हटकर यांनी सांगितले.