rickshaw driver beaten with stone : रस्त्यामधून चालणाऱ्या पादचाऱ्यांना दूर करण्यासाठी शनिवारी रात्री साडे बारा वाजता ठाकुर्ली भागात राहत असलेल्या एका रिक्षा चालकाने ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाच्या भागातील रस्त्यावरून जात असताना भोंगा वाजविला. त्याचा राग एका पादचाऱ्याला आला. त्याने रिक्षा चालकाला भोंगा का वाजविला, असा प्रश्न करून बाजूला पडलेला एक मोठा दगड रिक्षा चाकाच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले.

पादचाऱ्याने अचानक हल्ला केल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यात दगडाचा वर्मी घाव बसला. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून पादचाऱ्याला दूर केले, अन्यथा पादचाऱ्याने रिक्षा चालकाला आणखी मारहाण केली असती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. लक्ष्मण चौधरी असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ते ठाकुर्ली पूर्वेतील विसर्जन तलाव भागातील एका सोसायटीत कुटुंबीयांसह राहतात. शनिवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान ते प्रवासी वाहतूक करत होते. काही प्रवासी रस्त्याच्या मध्यभागातून पायी चालले होते. त्यांना बाजूला करण्यासाठी रिक्षा चालक चौधरी यांनी रिक्षेचा भोंगा वाजविला. त्यावेळी त्या प्रवाशाला राग आला. त्याने लक्ष्मण यांना भोंगा का वाजविला असा प्रश्न केला. आपण रस्त्याच्या मध्य भागातून चालला होता. तुम्हाला रिक्षेचा धक्का लागला असता म्हणून भोंगा वाजवून बाजूला होण्याचा इशारा दिला, असे लक्ष्मण चौधरी यांनी पादचाऱ्याला सांगितले. पण पादचारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने लक्ष्मण यांच्या बरोबर भांडण उकरून काढले. रस्त्याच्या कडेला पडलेला एक मोठा दगड उचलून तो त्याने रागाच्या भरात लक्ष्मण यांच्या डोक्यात मारला. अचानक हल्ला झाल्याने लक्ष्मण रक्तबंबाळ झाले. इतर रिक्षा चालक, प्रवासी मध्ये पडले म्हणून अन्यथा पादचाऱ्याने चौधरी यांना बेदम मारहाण केली असती, असे इतर प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला अटक

हेही वाचा – ऑनलाईन जुगारामुळे कर्ज झाल्याने वृद्धेची हत्या करुन दागिन्यांची चोरी

रिक्षा चालक चौधरी यांच्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. लक्ष्मण यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. लक्ष्मण यांचा मुलगा अनिकेत (२३) याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर काते तपास करत आहेत.