डोंबिवली – मागील काही वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेत स्वच्छ, सुंदर आणि देखणा प्रभाग म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवलीतील टिळकनगर प्रभागाची दुर्दशा झाली आहे. भाजप, संघाचा वरचष्मा असलेला हा प्रभाग उच्चशिक्षित नोकरदार, व्यावसायिकांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. आगामी कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीचा विचार करून टिळकनगर प्रभागातील काही जाणत्यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत टिळकनगर प्रभागातील नगरसेवक हा स्थानिकच असावा. तो उपरा नको, अशी जोरदार जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
स्थानिक नगरसेवक हा स्थानिक भागात राहतो. त्याला प्रत्येक नागरी समस्या, विकास कामे कोठे करायची याची जाणीव असते. अशा स्थानिक नगरसेवकाचे जनसंपर्क कार्यालय टिळकनगर प्रभागात असते. त्यामुळे आपल्या समस्या तेथे जाऊन मांडण्याची सोय नागरिकांना उपलब्ध असते. त्यामुळे असा स्थानिक उमेदवार आगामी पालिका निवडणुकीसाठी टिळकनगर प्रभागातून उभा राहील यासाठी टिळकनगरमधील काही जाणत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
काही वर्षापूर्वी स्वच्छ, सुंदर टिळकनगर प्रभाग पाहण्याची सवय लागलेल्या टिळकनगरमधील रहिवाशांना आता टिळकनगर प्रभागात अनेक ठिकाणी पडलेला कचरा, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहत असलेल्या गाड्या, टिळकनगरचे हरवलेले, रंगवलेले देखणेपण गायब झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
चार सदस्य प्रभाग पध्दतीत टिळकनगर प्रभाग दोन ते तीन भागात फोडण्यात आला आहे. याचीही जाणीव टिळकनगरमधील रहिवाशांना आहे. अशाही परिस्थितीत मूळ टिळकनगरचा भाग असलेल्या प्रभागात टिळकनगरमधील रहिवासी असलेला रहिवासीच उमेदवार असेल आणि त्यासाठीच टिळकनगर मधील रहिवाशांनी काम करावे आणि आपला हक्काचा, आपल्या हाकेला धाऊन येणारा नगरसेवक आपल्या प्रभागात असेल यादृष्टीने जनजागृती मोहीम प्रभागात सुरू केली आहे.
या जनजागृतीचा भाग म्हणून काही जाणत्यांनी यापुढे टिळकनगर प्रभागात स्थानिकच नगरसेवक असावा. बाहेरचा नको. मागील दहा वर्ष आम्ही पारतंत्र्यात घालवली. आता यापुढे ती परिस्थिती नको, अशा आशयाचे फलक टिळकनगर प्रभागात झळकवले आहेत. हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. टिळकनगर प्रभागाचे आतापर्यंत कल्याण डोंबिवली पालिकेत सहकारी क्षेत्रातील तज्ज्ञ सुरेश पिंगळे, मंगला सुळे, मनोज राजे यांनी नगरसेवक म्हणून नेतृत्व केले. त्यानंतर मागील दहा वर्षाच्या काळात भाजपचे राजन आभाळे या बाहेरील उमेदवाराने टिळकनगर प्रभागाचे नेतृत्व केले.
बाहेरील उमेदवार असला की त्यांच्याशी नागरी समस्या सोडविताना अडचणी येतात. त्यांना वेळेवर काही सांगता येत नाही. ते प्रभागात वेळेत येतातच असे नाही. त्यांचे कार्यालय प्रभागात नसल्याने तक्रारी कोणाकडे मांडायच्या असा प्रश्न नागरिकांना पडतो. त्यामुळे यावेळी आम्ही आगामी पालिका निवडणुकीसाठी टिळकनगर मधील स्थानिक उमदेवार निवडणूक रिंगणात असेल यादृष्टीने प्रयत्न करणार आहोत, असे टिळकनगरमधील काही मोहीम राबविणाऱ्या जाणत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
