|| किशोर कोकणे

गेल्या दोन वर्षांत साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

ठाणे : नागरीकरणामुळे विस्तारत चाललेल्या ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांत अमली पदार्थ तस्करीचे जाळेही विस्तारत चालले आहे. या शहरांतील तरुणाईला लक्ष्य करून त्यांना अमली पदार्थाच्या व्यसनाच्या जाळय़ात ओढण्याचे प्रकार सातत्याने सुरू असून पोलिसांच्या कारवाईनंतरही यावर नियंत्रण आलेले नाही. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी जवळपास साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करून २६० जणांना अटकही केली आहे. मात्र, तरीही शहरांत अमली पदार्थ विक्रेत्यांचा अंमल कायम आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये अमली पदार्थाच्या सेवनात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र असून गेल्या दोन वर्षांत ठाणे शहर पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. बाजारात अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये गांजा आणि चरसची झिंग अद्यापही कायम असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून दिसून येत आहे. ठाणे पोलिसांनी गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत अमली पदार्थ बाळगणाऱ्या २६० जणांना अटक केली. त्यापैकी १७८ जणांना अमली पदार्थ सेवनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याआधीच्या वर्षी, २०१८ मध्येही पोलिसांची कारवाई सुरूच होती. खबऱ्यांकडून मिळणारी माहिती, समाजमाध्यमे येथून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई सुरूच असते. मात्र, तरीही अमली पदार्थ विक्रीचे जाळे पसरत चालल्याचे चित्र आहे.

इतर अमली पदार्थाची विक्री चरस, गांजा यासह एमडी,

हेरॉईन, केटामाईन, अफू आणि सिरपचे सेवनही मोठय़ा प्रमाणात आढळत आहे. २०१९ मध्ये पोलिसांनी १४ लाख ४१ हजार १३० रुपयांचे एमडी जप्त केले, तर ३ लाख ३३ हजार १५० रुपयांचे हेरॉईन जप्त केले. २०१८ मध्ये पोलिसांनी ३४ लाख २५ हजार ९०० रुपयांचे एमडी आणि ६ लाख २० हजार रुपयांचे इफ्रेडीन जप्त केले आहे.