ठाणे : दोन वर्षांपूर्वी कंपनी बंद करून कामगारांना बेरोजगार करणाऱ्या सुपरमॅक्स कंपनीची मालमत्ता कामगार विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ताब्यात घेऊन त्याला टाळे लावले आहे. या मालमत्तेवर कोणालाही पुढील न्यायालयीन आदेशापर्यंत कोणताही व्यवहार करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कामगार विभागाने केलेल्या कारवाईमुळे कंपनी कामगारांना देणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे येथील तीन हात नाका परिसरात ६० ते ७० वर्षांपासून सुपरमॅक्स कंपनी आहे. या कंपनीत दाढी करण्यासाठी लागणारे ब्लेड तयार करण्यात येते. या कंपनीत सुमारे दीड हजारांच्या आसपास कामगार कार्यरत आहेत. २०२२ साली कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवू शकत नसल्याचे कारण पुढे करत अचानकपणे कंपनी बंद केली. यामुळे कंपनीतील १५०० कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. व्यवस्थापकाकडून कंपनी बंदची कोणतीही अधिकृतरीत्या सूचना देण्यात आली नव्हती. कंपनी बंद झाली असली तरी, तुम्हाला वेतन दिले जाईल असे आश्वासन कंपनी व्यवस्थापकांकडून देण्यात आले होते, असा दावा कामगारांनी केला होता. गेल्या दोन वर्षांपासून वेतन मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्या लवकरच सोडवू असे आश्वासन दिले.

हेही वाचा – बाजारात रेनकोट, छत्र्या खरेदीसाठी गर्दी; छत्र्या – रेनकोटच्या दरात वाढ

हेही वाचा – डोंबिवलीतील इंडो अमायन्स कंपनी प्रशासनावर गुन्हा; सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यातील बाबी समजून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. कामगारांच्या बाजूने शासन यंत्रणा कामाला लागली आणि तात्काळ राज्य शासनाच्या कामगार विभागाने संबंधित मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांना टाळे लावले. या आदेशानुसार आता या मालमत्तेवर कोणाला पुढील न्यायालयीन आदेशापर्यंत कोणताही व्यवहार करण्यास प्रतिबंधित करण्यात आला आहे. यामुळे गहाण, तारण विक्रीचा प्रयत्न केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा तो आदेश आहे. यामुळे कामगार वर्गात नवीन आशेचा किरण निर्माण झालेला आहे.