ठाणे: ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी आगारातून भिवंडीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी छत तसेच थांब्याची सुविधा नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे स्थानकाजवळील एसटी आगारातुन प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना उन्हाचा मारा सहन करत उभे रहावे लागत आहे.

दुपारच्या वेळेत महिला तसेच वृद्धांचे अधिक हाल होत असल्याचे चित्र आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वर्दळ असते. याच स्थानक परिसरात असलेल्या एसटी आगारातून दररोज नोकरदार, व्यावसायिक, मजूर आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी असे हजारो प्रवासी प्रवास करतात. या आगारातून भिवंडी वाडा, जव्हार, वसई-विरार, भाईंदर, बोरिवली, डहाणू या भागांत जाणाऱ्या बसगाडय़ा सुटतात. परंतुु आगारात असलेल्या असुविधांमुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

आगारातील थांब्यांचे तुटलेले छप्पर, त्यातून निखळणारे प्लास्टर, इमारतीला गेलेले तडे अशा अवस्थेत असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) आगारातून ये-जा करणारे प्रवासी दररोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. त्यातच या आगारातुन भिवंडीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी छप्परची सुविधा त्याचप्रमाणे थांब्याची देखिल सुविधा नसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे भिवंडी येथे जाणाऱ्या प्रवाशांना भर उन्हात उभे राहून बसगाडीची वाट पहावी लागत आहे. त्यात दुपारच्या वेळेत उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

हेही वाचा

वयोवृद्ध, लहान मुले आणि महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भिवंडीतील प्रवाशांसाठी तात्पुरत्या छताची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थांब्यांची सुविधा आहे. परंतु त्या ठिकाणी असलेले छप्पर हे निखळलेले आहेत. त्यामुळे येथे बसगाडय़ांची प्रतीक्षा करत उभे राहणेही प्रवाशांना धोक्याचे वाटू लागले आहे.

प्रतिक्रिया

सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात. त्यात भिवंडीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोणताही थांबा उभारण्यात आला नाही. यामुळे बसगाडी येईपर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. प्रशासनाने या ठिकाणी छप्परची सोय करावी. – सुवर्णा तिकुडवे, प्रवासी

भिवंडीला जाण्यासाठी बसगाड्या थांबतात त्या ठिकाणाहून आगारातील इतर गाड्या बाहेर पडत असतात. त्यामुळे याठिकाणी थांब्याची सोय करता आली नाही. परंतु त्याच ठिकाणी एका बाजूला या प्रवाशांसाठी छप्परची सोय करण्याचा प्रयत्न केला जाईल. – सागर पळसुले, विभाग नियंत्रक