डोंंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांंक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटावर गेल्या वर्षापासून छत नसल्याने प्रवाशांना आता उन्हाचे चटके सहन करत लोकल प्रवास करावा लागतो. मुंंबईला जाणारा बहुतांशी प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक पाचवरील जलद लोकल पकडण्याला प्राधान्य देतो, या सर्व प्रवाशांना फलाटावरील छताअभावी आता उन्हाचे चटके सहन करावे लागतात.

मागील तीन ते चार वर्षापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकात १५ डब्याच्या लोकल उभ्या राहाव्यात अशा लांबीच्या फलाटांची बांधणी करण्यात आली आहे. फलाट क्रमांंक पाचवर पंधरा डब्याच्या फलाटामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे धावणाऱ्या लोकल आता तीन डबे दिवा बाजूने जाऊन थांंबत आहेत. फलाटाच्या या विस्तारित भागात गेल्या दीड वर्षापासून छत नाही. त्यामुळे आता उन्हाचे चटके सहन करत प्रवाशांना लोकल पकडावी लागते. दुपारी एक ते चार वाजण्याच्या दरम्यानच्या लोकल पकडताना प्रवाशांची सर्वाधिक होरपळ होते. या तीन डब्यांमध्ये एक डबा महिलांचा असतो. त्यामुळे महिलांना उन्हाचे चटके सहन करत लोकल येईपर्यंत फलाटावर उभे राहावे लागते.

हेही वाचा – डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

गेल्या वर्षी पावसाळ्यात छताअभावी प्रवाशांना पावसाचा त्रास सहन करावा लागला होता. या छताचे काम लवकर पूर्ण करावे म्हणून प्रवाशांनी, रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून मुंबईला अति जलद लोकल धावतात. या लोकलने प्रवास करण्याला प्रवाशांचे अधिक प्राधान्य असते. त्यामुळे या फलाटावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. फलाट पाचवर येणाऱ्या सर्वच लोकल विस्सारित भागात थांबतात. त्यामुळे लोकलचे तीन डबे छत नसलेल्या भागात थांबतात. अनेक प्रवासी छत्री घेऊन, महिला डोक्यावर ओढण्या घेऊन उन्हाचा त्रास टाळण्यासाठी फलाटावर लोकलची वाट पाहत उभे असतात.

हेही वाचा – भिवंडीतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारादरम्यान पिस्तुल, परंतु खेळण्यातील….

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर विस्तारित भागात छत बसविण्याच्या कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला की तातडीने हे काम हाती घेण्यात येणार आहे.

मागील वर्षभर डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात छत नाही. प्रवासी उन, पावसात उभे राहून प्रवास करतात याविषयी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवासी उत्पन्नातून सर्वाधिक महसूल रेल्वेला मिळतो तरी प्रवाशांना सुविधा देण्यात टाळाटाळ का केली जाते. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघ, डोंबिवली.