शहापूर : मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि आटगाव स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेची तार कापली गेल्याने बुधवारी येथील दोन्ही मार्गिकांवरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. सुमारे साडेचार तासांनंतर येथील सेवा सुरळीत झाली. या बिघाडामुळे कसारा भागातील प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही.

आसनगाव – आटगाव स्थानकादरम्यान बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणेची तार कापली गेली होती. त्यामुळे कसाऱ्याच्या दिशेने वाहतूक करणारी आणि कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प झाली. सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी सुमारे साडेचार तास लागले. त्यामुळे डाऊन मार्गावरील गोदान एक्स्प्रेस, आसनसोल एक्स्प्रेस, धुळे एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, बनारस स्पेशल, मंगला एक्स्प्रेस, कामयानी एक्सप्रेस, जनता एक्सप्रेस आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नोकरदारांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to malfunction in the signal system between asangaon and gaon station the train service was stopped for four and a half hours amy
First published on: 09-05-2024 at 06:43 IST