ठाणे: जिल्ह्यात मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने शहरातील तीन ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली. या पावसामुळे काही भागांत वाहतूक विस्कळीत झाली, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे एका ठिकाणी झाड वाहनावर पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पडलेली झाडे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी कापून बाजूला केले.

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास पाऊस पडण्यास सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे शहर परिसरातील विविध भागांत झाडांच्या फांद्या कोसळल्या. मंगळवारी रात्रीपर्यंत तीन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन यांनी दिली.

मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास पाचपाखाडी येथील गुरूकुल सोसायटीजवळ झाड पडले होते. तर, ८.५४ वाजताच्या सुमारास कळवा येथील हिरा पन्ना मॉलजवळ असलेले झाड उन्मळून पडले. त्याचबरोबर पातलीपाडा येथील रिवेरा इमारती समोर ११.१२ वाजताच्या सुमारास झाड पडले. हे झाड इमारतीच्या आवारात उभ्या असलेले चारचाकी वाहनावर पडल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे. पडलेले झाड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. झाडे तसेच फांद्या कोळल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने फांद्या हटविण्याचे काम सुरू केले.

शहरात झालेल्या पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. ठिकठिकाणी वाहतुक कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी तुंबले होते. तर काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.