‘महावितरण’ची ऑनलाइन यंत्रणा ढेपाळली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महावितरणने दोन दिवसांपासून ग्राहकांकडील वीज देयके ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑनलाइन पद्धतीने कामकाज करताना कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणींना सतत सामोरे जावे लागत आहे. सतत संगणक यंत्रणा ठप्प होत असल्याने ‘महावितरण’च्या डोंबिवली, ठाणे आणि कल्याण परिसरातील वीज देयक भरणा केंद्रांवर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत.

महावितरणने वीज देयक स्वीकारण्यासाठी खासगी संस्था नेमल्या आहेत. डोंबिवली पूर्वेत बाजीप्रभू चौक, राजाजी रस्ता, आनंदनगर, उमेशनगर, फुले रस्ता शिवमंदिर, चार रस्ता या ठिकाणी वीज देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन वीज देयक भरण्याच्या यंत्रणेतील दोषांमुळे एकेक देयक भरण्यास दहा मिनिटे लागत आहेत. त्यामुळे देयक भरणा केंद्रांवर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. गुरुवारी अनेक केंद्रांवर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. रांगेत ताटकळत राहावे लागत असल्याने अनेक नागरिकांनी रांग सोडून परतण्याचा निर्णय घेतला.

‘गेल्या दोन दिवसांपासून वीज देयक भरताना वीजभरणा केंद्रातील कर्मचारी ग्राहकाचे देयक स्वीकारतो. त्या देयकावरील ग्राहक क्रमांक संगणकातील सॉफ्टवेअरमध्ये टाकतो. ग्राहक क्रमांक बरोबर असूनही अनेक वेळा संगणकातील यंत्रणा तो क्रमांक मान्य करीत नाही. त्यामुळे चार ते पाच वेळा ग्राहक क्रमांक टाकावा लागतो. ग्राहक क्रमांक यंत्रणेशी जुळला की मग पुढील प्रक्रिया बरोबर व्हाव्या लागतात. अन्यथा एकच वीज देयक समोर घेऊन बसावे लागते. देयक भरणा केल्याशिवाय दुसऱ्या ग्राहकाचे देयक स्वीकारता येत नाही. यापूर्वी हाताने देयक स्वीकारण्याची पद्धत होती. त्या वेळी एका मिनिटाला तीन ते चार देयक भरणा करून व्हायची. त्याची सवय ग्राहकांना लागली आहे. त्यामुळे आता ग्राहक रांगेत उभा राहण्यास तयार नाहीत,’ असे एका केंद्रावरील कर्मचाऱ्याने सांगितले.

महावितरण’चा संगणकीय काम सुरळीत ठेवणारा सव्‍‌र्हर बुधवारी डाऊन झाला होता. त्यामुळे ऑनलाइन वीज देयक स्वीकारण्यात थोडे अडथळे आले होते. गुरुवारी सकाळपासून सव्‍‌र्हर सुस्थितीत झाला आहे. ऑनलाइन यंत्रणेतील दोष दूर होऊन देयक स्वीकारण्याची कामे केंद्रांवर सुरू झाली आहेत.

भारत पवार, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity bill payment issue mahadiscom