ठाणे : ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत असून, महापालिकेचे कार्यक्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात पायाभुत सुविधा निर्माण करण्याचे काम करणाऱ्या ठाणे महापालिकेतील अभियंत्यांनाही अनेक समस्या भेडसावत असून त्या सोडविण्यासाठी अभियंत्यांनी एकत्रित येऊन ‘ठाणे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन’ या नव्या संघटनेची स्थापना केली आहे.
यापुर्वी ठाणे पालिकेत अभियंत्यांची अधिकृत संघटना नव्हती. यामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व्यासपीठ नव्हते. त्यामुळेच अभियंत्यांनी एकत्रित येऊन संघटनेची स्थापना केली आहे. ही संघटना ठाणे महापालिकेतील एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनशी संलग्न असून, प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात सौहार्दपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण राहावे, यासाठी ही संघटना कार्यरत राहणार आहे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ठाणे महापालिकेतील कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी म्युनिसिपल लेबर युनियन सातत्याने सक्रिय भूमिका बजावत असते. त्याचप्रमाणे, सातवा वेतन आयोग, कर्मचारी भरती, वाढीव वेतन, व इतर अनेक प्रश्नांबरोबरच अभियंत्यांच्या व्यावसायिक आणि शासकीय अडचणी सोडविण्यासाठी या नव्या संघटनेच्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या संदर्भात मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. आयुक्त राव यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना यावेळी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ठाणेकर नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि पालिकेच्या उन्नतीसाठी अभियंते नेहमीच तत्पर राहतील, असे ठाणे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतन आंबोणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
नवनियुक्त संघटनेचे पदाधिकारी
ठाणे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्ष पदी चेतन आंबोणकर, कार्याध्यक्षपदी प्रमोद निंबाळकर, उपाध्यक्ष पदी रामदास शिंदे, सरचिटणीसपदी स्वप्नील काशीद, खजिनदार पदी राजेश सावंत, उपाध्यक्ष पदी किशोर गोळे, प्रवीण सापळे, महेश बोराडे, जन्मजय मयेकर, रामकृष्ण देसले, सय्यद दावलशाह, चिटणीस पदी विजय खानविलकर, जमनाताई जाधव, गणेश भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
