नीलेश पानमंद / आशीष धनगर

रस्त्यावरील बेकायदा वाहतुकीला लगाम; रहिवाशांना वाहने उभारण्याची अधिकृत सोय

गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता ठोस पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने सम-विषम पार्किंग, एकदिशा मार्ग, नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात येत आहे. या क्षेत्रांमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून त्याचबरोबर रस्त्यावर बेकायदा वाहन उभे केल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसांसोबत होणारे वाद टळणार आहेत. याशिवाय, कल्याण-डोंबिवलीकरांना रस्त्यावर अधिकृतपणे वाहन उभे करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांतील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडू लागले असून यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत आहे. या दोन्ही शहरांमध्ये पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे शहरातील नागरिक रस्त्यावर कोठेही वाहने उभी करीत असून त्यामुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी आता या दोन्ही शहरांत सम-विषम पार्किंग, एकदिशा मार्ग, नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शहरातील विविध रस्त्यांवर हे क्षेत्र निश्चित करण्यासंबंधीच्या अधिसूचना काढण्यात आल्या असून त्याची वाहतूक पोलिसांनी अंमलबजावणी करण्यासही सुरुवात केली आहे. सुरुवातीला १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे बदल लागू करण्यात येणार असून त्याचा वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन ते कायमस्वरूपी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. कल्याण पूर्वेत वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांचे सर्वेक्षण करून सम-विषम पार्किंग आणि नो पार्किंगचे क्षेत्र तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये अरुंद आणि गर्दीचे रस्ते, उड्डाणपूल, चौक आणि चौकाचा परीघ वगळून हे नियोजन करण्यात येत आहे. शाळेचे प्रवेशद्वार, रुग्णालयाचे प्रवेशद्वार, मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुरक्षित अंतरावर किंवा एक तरी वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध होईल, या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिस्त लावण्यासाठी सम-विषम पार्किंग, एकदिशा मार्ग, नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी रस्त्यांची पाहाणी करून टप्प्याटप्प्याने हे क्षेत्र निश्चित करण्यात येत आहेत. कोलशेवाडी वाहतूक शाखेच्या हद्दीसाठी अशाप्रकारची अधिसूचना काढली असल्याचे ठाणे वाहतूक शाखा  पोलीस उपायुक्त अमित काळ यांनी सांगितले.

सम-विषम पार्किंग ठिकाणे

कोळशेवाडी वाहतूक शाखेने बदलाची अधिसूचना काढली असून त्यानुसार तीसगाव नाका येथील पांडुरंग गायकवाड चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजर्षी शाहू महाराज उद्यान ते कल्याण पूर्व केडीएमटी बस थांबा. तसेच ए-वन स्विट कॉर्नर चौक ते काळुबाई चौक या ठिकाणी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सम-विषय पार्किंग लागू करण्यात आली आहे. दीड ते दोन किमी अंतरापर्यंत ही पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून याचप्रकारे कल्याण-डोंबिवली शहरातील अन्य भागांतही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नो-पार्किंग ठिकाणे

कल्याण आणि डोंबिवली शहरांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शाहू महाराज उद्यान, कल्याण शिळ रोडवरील पिसवली गाव गेट कमान ते हाजी मलंग रोडवरील चेतना शाळेपर्यंतचा रस्ता, लोढा पलावा जंक्शनजवळील अग्निशमन केंद्रासमोरील चौक ते कासाकीओ गोल्ड वसाहतीचे गेट क्रमांक १ पर्यंत, मोनार्क बुटीक हॉटेलच्या समोरील रोड, लोढा-पलावा जंक्शन चौक शेजारील लक्ष्मीकृपा हॉटेल ते ए-वन स्वीट कॉर्नर चौक, लोढा-पलावा मॉलसमोरील जंक्शन चौक ते कासाबेला वसाहतीचे सर्कल चौकपर्यंत या ठिकाणी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.