डोंबिवली : अमरावती, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी महिला, पुरूष, मुलांनी तयार केलेल्या हस्त केलेच्या बांबू, लाकूड, कपडे, जंगलातील फळे, वनस्पतींची मुळे, फुलांपासून तयार केलेल्या कोरीव, देखण्या वस्तू, औषधी वनस्पतींचे प्रदर्शन डोंबिवली पूर्वेतील आगरकर रस्त्यावरील आदित्य सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनने समन्वय नावाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात आदिवासी भागातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तुं बरोबर डोंबिवली शहर परिसरातील मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारपासून हे प्रदर्शन सुरू झाले आहे. रविवारी (ता. ५) रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे, असे या प्रकल्पाच्या प्रमुख अंजली जोगळेकर यांनी सांगितले.
अमरावती धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरातील संपूर्ण बांबू केंद्र गटातील कारागिर बांबूपासून तयार केलेल्या गृहपयोगी, घर सजावटीच्या वस्तू घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी कारागिर बांबूपासून तयार केलेले विविध प्रकारचे प्राणी, शिट्टी, घर सजावटीच्या वस्तू, भित्तीचित्रे घेऊन या प्रदर्शनात सहभागी आहेत. विवेकानंद सेवा मंडळाच्या डोंबिवली पूर्वेतील नियंत्रणाखाली कसारा विहिगाव भागात महिला बचत गट चालविले जातात. या महिला बचत गटांना अगरबत्ती, मेणबत्ती, दिवाळीतील दिवे, सुंगधित उटणी, शेणापासून तयार केलेले सुगंधित धूप तयार करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. या वस्तू या प्रदर्शनात दिवाळीच्या पूर्वसंध्येला खरेदीची नागरिकांना संधी आहे.
डोंबिवलीतील क्षितिज मतिमंद शाळेतील मुलांनी तयार केलेल्या आकर्षक भेट वस्तू, शुभेच्छा पत्रे, विविध प्रकारची कागदी फुले प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आरोग्यास पोषक असा ग्रामीण भागातील जुना भात गिरणीत सफाई न केलेला विविध प्रकारचा जुना तांदुळ याठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विविध वस्तू, कलाकुसरीच्या सामानाचा वापर करून तयार करण्यात आलेले विविध प्रकारचे आकर्षक दागिने प्रदर्शनात पाहण्यास मिळतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव येथील पुणे येथील वनऔषधी आदिवासी संशोधन केंद्राखाली काम करणाऱ्या संस्थेने जंगलातील विविध प्रकारच्या वनस्पती, त्यांची मुळे यापासून तयार केलेली ग्रामीण बाजाची प्रभावी औषधे या प्रदर्शनात आहेत.
विविध भागातून आलेल्या या कारागिरांची निवास, भोजनाची सोय रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनने केली आहे. विविध भागातून आलेल्या आदिवासी कारागिरांकडून सभागृह, प्रदर्शन मंचाचे कोणतेही शुल्क न आकारता त्यांना सभागृहात वस्तू विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. आदिवासी भागातील लोकांचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कशाळकर आणि सहकारी या उपक्रमात सहभागी आहेत.
आदिवासी दुर्गम भागातील कलाकारांच्या वस्तूंना शहरी बाजारपेठ मिळावी. ग्रामीण संस्कृती आणि तिचे महत्व या वस्तुंच्या माध्यमातून शहरी भागातील नागरिकांसमोर यावे. या वस्तू विक्रीतून आदिवासी, ग्रामीण कारागिरांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळावेत हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे. अंजली जोगळेकर प्रकल्प प्रमुख, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन.