कोलशेत येथील लोढा अमारा या गृहसंकुलात राहणारी शिक्षिका ११ वर्षीय घरकाम करणाऱ्या मुलीला बेदम मारहाण करित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा अमारा या गृह संकुलात शिक्षिका वास्तव्यास आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी तिने दिल्ली येथून ११ वर्षीय मुलीला घरकामासाठी आणले होते. परंतु  किरकोळ कारणांवरून ती शिक्षिका मुलीला मारहाण करत होती. तसेच तिला जेवण्यासाठी पुरेसे अन्न दिले जात नव्हती. शिक्षिकेच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी देखील तिच्यावर होती.

हेही वाचा >>> डोंबिवलीजवळील गोळवलीत बेकायदा बंगला भुईसपाट

साभांळ व्यवस्थित केला नसल्याने तिला घरातील एका पाइपने मारहाण करण्यात आली होती. तिला घरातून बाहेर पडण्यास अटकाव केला जात होता. बुधवारी सकाळी मुलीने घरातील खिडकीत वाळत घातलेला कपडा बाहेर फेकला. कपडा आणण्यासाठी जात असल्याचे सांगत ती घरातून बाहेर पडली. इमारती खाली आल्यानंतर खाली जमलेल्या महिलांकडे तिने तिच्या आईला संपर्क साधण्याची विनवनी केली. महिलांनी गांभीर्य ओळखून याची माहिती इमारतीतील रहिवाशांना दिली. याच गृहसंकुलात राहणाऱ्या वकिल मीना विद्युत टा यांनी तात्काळ नागरिकांच्या मदतीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अल्पवयीन मुलीने याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे.