Thane News : ठाणे : सार्वजनिक शौचालयात किरकोळ कारणावरून झालेल्या एका वादाचे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले. एका तरुणाला शौचालयाच्या बादलीच्या प्रकरणावरून हाता-पायाला चावा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११७ (२), ११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
किरकोळ कारणांवरुन वादाचे प्रसंग अनेकदा समोर येतात. त्यात भिवंडी शहरात एका किरकोळ वादाचे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले आहे. याप्रकरणात ३२ वर्षीय रियाज अहमद राहील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकारावरून किरकोळ घटनांचा वाद किती गंभीर होऊ शकतो हे समोर येत आहे.
प्रकरण नेमके काय
– भिवंडी येथील आमपाडा येथे ही घटना रविवारी उघडकीस आली. यातील तक्रारदार हा २२ वर्षीय असून त्याने शौचालयात प्लास्टिकची बादली ठेवली होती. त्याचवेळी रियाज हा तेथे गेला होता. त्याने त्या बादलीला लाथ मारली. याबाबतचा जाब विचारण्यासाठी तक्रारदार आणि त्याची १४ वर्षीय बहीण रियाज याच्याकडे गेली होती. त्यामुळे संतापलेल्या रियाजने दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, रियाजने तक्रारदार याला धक्काबुक्की केली. तसेच हाताच्या अंगठ्याला, उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ चावा घेऊन दुखापत केली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११७ (२), ११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.