डोंबिवली – डोंबिवलीतील स. वा. जोशी प्रांगणातील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेतील पाच वर्ष ११ महिन्यांच्या दोन जुळ्या बहिणींनी मागील अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विविध भागातील १०० गड किल्ल्यांना आपल्या आई, वडिलांच्या साथीने गवसणी घातली आहे. बालवयातील या भ्रमंतीबद्दल या दोन्ही बालिकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेशा कदम आणि रेशवी कदम अशी या दोन बालिकांची नावे आहेत. त्या जुळ्या बहिणी आहेत. ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेत त्या शिशुवर्गात शिक्षण (यु. के. जी) घेत आहेत. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून प्रेशा, रेशवी आपली आई रेश्मा, वडिल परेश कदम यांच्या समवेत गड,किल्ल्यांच्या भ्रमंतीसाठी जाऊ लागल्या. निसर्गरम्य, डोंगर, दऱ्यांची आवड त्यांना निर्माण झाली. वय वर्ष तीन असताना या बालिकांनी स्वत पायी प्रवास करत १२ गड किल्ल्यांना गवसणी घातली होती. आतापर्यंत या बालिकांनी १०० गड किल्ल्यांची भ्रमंती पूर्ण केली आहे. अल्प वयात विक्रमी गड किल्ल्यांची भ्रमंती केल्याबद्दल भारतीय विक्रमी नोंद बुकात त्यांची नोंद झाली आहे.

राज्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर कळसुबाई, याशिवाय साल्हेर, कलावंतीण, सुधागड,भास्करगड, हरिश्चंद्रगड,सागरगड, विलश्रामगड, कर्नाळा, सिंहगड, रायगड, राजगड, आसावा असे अनेक चढणीला अवघड, किचकट वाटणारे किल्ले या बालिकांनी पायी प्रवास करत चढले आहेत. अलीकडील बहुतांशी मुले मोबाईल, समाज माध्यमी झाली आहेत. अशा वातावरणात या दोन्ही बालिकांना गड, किल्ले, डोंगरे, दरे, पाणी यांचे आकर्षण वाटू लागल्याने त्याचेही सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

या दोघींना आम्ही गड, किल्ल्यांसंंदर्भात घरगुती पध्दतीने मार्गदर्शन करतो. गड, किल्ल्यांवर जाण्यापूर्वी आम्ही तेथील सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देतो. गड, किल्ल्याची वाट, चढण, तेथील अडथळे याची समग्र माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्या किल्ल्याची भ्रमंती निश्चित करतो, असे या दोन्ही बालिकांचे वडील परेश कदम यांनी सांगितले.

या दोन्ही मुलींची गड, किल्ले, निसर्गाची आवड जोपासली जाईल. त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे त्यांना गड किल्ले चढाईचे चांगल्या संस्थेकडून प्रशिक्षण मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु, त्यांनी निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग या क्षेत्रात यावे की नाही ही त्यांची आवड असेल. यासाठी आम्ही त्यांच्यावर दबाव टाकणार नाही. शिक्षण पूर्ण करून या सगळ्या बाह्य गोष्टी आम्ही करू, असे कदम यांनी सांगितले. भ्रमंतीच्या काळात १०० किल्ल्यांवरील दगड, माती आपल्या इतिहासकालीन खुणा, प्रेरणास्त्रोत म्हणून आम्ही जमा केल्या आहेत, असे कदम यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five year old twin sisters from blossom school in dombivli explore 100 forts amy