कल्याण – बदलापूर शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उपशहरप्रमुख मोहन राऊत हत्या प्रकरणातील चार आरोपींना ठाणे येथील विशेष मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी बुधवारी सबळ पुराव्यांच्या आधारे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या आरोपींना प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. याच गुन्ह्यातील अन्य एका कलमाद्वारे आरोपींना न्यायालयाने एक वर्षाचा तुरूंगवास आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन बदलापूर उपशहरप्रमुख योगेश नारायण राऊत यांच्यासह चंद्रकांत उर्फ पिंट्या बाळाराम म्हसकर, गंगाराम उर्फ गंग्या आत्माराम लिंगे, अजय गजानन गौरव यांना विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. संगीता फड यांनी काम पाहिले. ११ वर्ष हा खटला विशेष न्यायालयात सुरू होता.
विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड यांनी दिलेली माहिती अशी, की मोहन राऊत बदलापूर शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. २३ मे २०१४ रोजी ते नेहमीप्रमाणे बदलापूरमधील आपल्या जनसंपर्क कार्यालयात पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान पोहचले. त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेले चार इसम मोहन राऊत कार्यालयात बसले असताना घुसले. त्यांनी जवळील रिव्हाॅल्व्हरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर ११ गोळ्या झाडल्या.
राऊत रक्ताच्या थारोळ्यात पडले. राऊत यांच्या कार्यालयात मोठा आवाज आला म्हणून आजुबाजुचे रहिवासी, कार्यालयासमोरील एक पानटपरीला त्यांच्या कार्यालयाच्या दिशेने आले. त्यावेळी चार इसम राऊत यांच्या कार्यालयाच्या मागील आणि पुढील दरवाजातून हातात पिस्तूल घेऊन पळून जाताना पाहिले.
राऊत गंभीर जखमी अवस्थेत होते. त्यांच्या बचावासाठी आलेल्या नागरिकांना आपल्यावर गोळीबार करणाऱ्या योगेश राऊत यांच्यासह आरोपींची नावे मोहन राऊत यांनी सांगितले. मोहन राऊत यांना तात्काळ खासगी त्यानंतर डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गोळीबाराच्या घटनेनंतर दीड तासाने मृत्यू झाला. याप्रकरणी मोहन यांचे भाऊ शिंदे शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. मृत्युपूर्वी मोहन यांनी पोलिसांना जबानी दिली होती.
या तपासाच्या दरम्यान पोलिसांना मिळालेली माहिती अशी, राष्ट्रवादीचे योगेश राऊत यांच्यावर यापूर्वी गोळीबार झाला होता. या गोळीबार करणाऱ्या आरोपींना जामीन मिळण्यासाठी मोहन राऊत प्रयत्न करत असल्याचा योगेश राऊत यांना संशय होता. त्यामुळे मोहन राऊत यांचा काटा काढण्याचा कट चार जणांनी रचला होता.
याप्रकरणातील एका आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने दहा वर्ष खटल्याचा निकाला लागला नाही म्हणून जामीन दिला होता. चार जणांना उच्च न्यायालयाने जामीन दिले होते. हे जामीन नंतर रद्द करण्यात आले होते. याप्रकरणात सरकार पक्षाने एकूण ३० साक्षीदार तपासले. राऊत यांच्या कार्यालयात सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या, त्यांची मृत्यूपूर्व साक्ष, पानटपरी चालक आणि इतर साक्षीदार या सर्व सबळ पुराव्यांच्या आधारे विशेष न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे आम्हाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांनी दिली.