कल्याण – पोलीस वाहनाच्या पुढील भागात बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. तुम्ही चार आरोपी उठून मागे जाऊन बसा, अशी सूचना एका हवालदाराने आधारवाडी तुरूंगातून कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आणलेल्या चार आरोपींना केली. आम्हाला मागे का बसायला लावले, या सूचनेवरून राग आल्याने संतप्त झालेल्या आठ पैकी चार आरोपींनी गुरूवारी संध्याकाळी अचानक या आरोपींच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. हल्ल्यात एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे.
हल्ला करताना आरोपींनी पोलिसांच्या खाकी गणवेशातील सदऱ्याची काॅलर पकडून शिवीगाळ करत मारहाण केली. अचानक एकावेळी चार तगडे आरोपी अंगावर आल्याने या आरोपींच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. या हल्ल्यात एक पोलीस गंभीर जखमी झाला. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय आवार परिसरात ही घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात या चार जणांच्या विरुध्द तक्रार केली आहे.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आकाश वाल्मिकी, योगिंदर उर्प भोलु धरमवीर मरोठिया, गणेश उर्फ शालु मरोठिया, विवेक शंकर यादव अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. विविध गुन्ह्यांत आरोपी असलेले आठ गुन्हेगार कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात दाखल आहेत. त्यांच्यावरील न्यायालयीन खटले सुरू आहेत. अशाच प्रकरणांमधील आठ आरोपी पोलिसांनी बंदोबस्तात पोलीस वाहनातून आधारवाडी कारागृतून सुनावणीसाठी कल्याण न्यायालयात आणले होते.
सुनावणीनंतर या आठही आरोपींना पोलिसांनी कडे करून बंदोबस्तात न्यायालयातून बाहेर काढले. त्यांना पोलीस वाहनात बसण्याची सूचना केली. आठही आरोपी वाहनात बसले. त्यानंतर पोलीस वाहनात बसण्यासाठी आले. वाहनाच्या पुढील भागात बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे आरोपींमध्ये अगोदर धुसफूस सुरू होती. हवालदार किशोर पेटारे यांनी वाहनाच्या पुढील भागात बसलेल्या चार आरोपींना वाहनाच्या पाठीमागील भागात जाऊन बसण्याची सूचना केली. आम्ही सुरूवातीलाच येऊन पुढील भागात बसलो आहे. आमच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो. आम्ही येथून उठणार नाही, अशी ताठर भूमिका चार आरोपींनी घेतली.
पोलिसांनी त्यांना समंजसपणे मागील भागात सूचना केली. पोलिसांंच्या सूचनेवरून चारही आरोपी रागात उठले आणि त्यांनी पोलिसांबरोबर आम्हाला काम मागे बसविता, अशी कारणे पुढे करत पेटारे यांच्यासह इतर पोलिसांबरोबर हुज्जत घातली. त्यानंतर आक्रमक झालेले गुन्हेगार पार्श्वभूमीचे हे चारही आरोपी अचानक पोलिसांवर चालून आले. त्यांनी पोलिसांना वाहनात बेदम मारहाण सुरू केली. पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत या चारही आरोपींना आवरले. त्यांना वाहनाच्या मागील भागात बसवून आधारवाडी कारागृहात नेले. या हल्ल्यात हवालदार पेटारे गंभीर जखमी झाले आहेत.
आधारवाडी कारागृहातून न्यायालयात आणलेले कैदी वेळोवेळी पोलिसांवर हल्ले करत असल्याच्या घटना वाढत आहेत. अनेक वेळा पोलीस आरोपींच्या नातेवाईकांना आरोपी बरोबर जास्त वेळ बोलू देत नाहीत. त्याचा राग या आरोपींच्या मनात असतो तो राग तो पोलिसांवर काढत असल्याचे एका माहितगाराने सांगितले.