बदलापूर : बदलापूर शहरात पुन्हा एकदा गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल साडेसात लाख रुपये सहा महिन्यांत दुप्पट परत मिळतील, असे आश्वासन देऊन एका महिलेने आणि तिच्या मुलाने फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे दुप्पट करण्याचा मोह अनेकांना मोठ्या आर्थिक संकटात टाकत असतो. अनेकदा अशा अमिषाला बळी पडून अनेकांची मोठी फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येतात. ऑनलाईन माध्यमातून अमिष दाखवून सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे प्रकार केले जातात. त्यांचा उलगडा अनेकदा होत नाही.
आर्थिक फसवणुकीत पैसे खात्यातून वळते झाल्यानंतर त्याचा परतीचा काळ असेपर्यंत त्याची नीटशी तक्रार होत नाही. त्यामुळे अशा फसवणुकीत कमी वेळा पैसे परत मिळतात. त्यामुळे नागरिक ओळखीच्या व्यक्तींकडे गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतात. मात्र ओळखीच्या व्यक्तींकडूनही फसवणुक झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार बदलापुरात समोर आला आहे.
प्रार्थना स्थळावर ओळख असल्याने त्यांच्या सांगण्यावरून उल्हासनगरातील एका ५६ वर्षीय व्यक्तीने बदलापुरातील माय लेकांकडे पैसे गुंतवले. मात्र त्याचा परतावा न मिळाल्याने त्यांची फसवणुक झाली. यातील फिर्यादी बेनेडीक्ट जोसेफ ओळखीच्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार आरोपींकडे गुंतवणुकीसाठी गेले. त्यांनी फिर्यादींना विश्वासात घेतले. फक्त सहा महिन्यांत गुंतवणुकीवर दुप्पट पैसे मिळतील, असे सांगत त्यांनी पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी यांनी ५ एप्रिल २०२४ रोजी ५ लाख रुपये नवजीवन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आपल्या खात्यातून ऍक्सिस बँक, बदलापूर येथील आरोपी महिलेच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पाठवले.
दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ एप्रिल रोजी आणखी अडीच लाख रुपये त्याच खात्यावर जमा केले. एकूण साडे सात लाख रुपये जमा करून ते पैसे दुप्पट होण्याची वाट पाहत होते. १ ऑक्टोबर २०२४ रोजी पैसे परत करण्याची मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांनी पैशांबद्दल विचारणा केली असता आरोपी रुद्र बागडे याने फोनवर पैशांबाबत मला काही माहिती नाही आणि पैसेही परत देऊ शकत नाही, असे स्पष्ट सांगून टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे विश्वासघात झाल्याचे लक्षात येत फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, रोहिणी बागडे व रुद्र बागडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.