मंडप बांधताना नियमांचे उल्लंघन; एक तृतियांशऐवजी निम्म्या रस्त्यावर अतिक्रमण

आगामी गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना रस्त्याचा केवळ एक तृतियांश भागच उपयोगात आणावा या नियमाला मीरा-भाईंदरमध्ये गणेशोत्सव मंडळांकडून हरताळ फासण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मंडप उभारणीसाठी रस्त्याच्या अध्र्याहून अधिक भागावर अतिक्रमण केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून महापालिका अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपर्ण दुर्लक्ष केले आहे.

गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. सजावटीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता गणेशोत्सव मंडळे १५ ते २० दिवस अगोदरच मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करतात. त्यानुसार मीरा-भाईंदरमध्ये ठिकठिकाणी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु मंडप उभारताना नियम मात्र पायदळी तुडवले जात आहेत.

मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी मंडप केवळ रस्त्याच्या एक तृतीयांश भागातच उभारण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत दिले होते. या सूचनांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारादेखील पाटील यांनी यावेळी दिला होता. या बैठकीला महापालिका आयुक्तांसह अनेक अधिकारीदेखील उपस्थित होते. मंडप उभारणीची परवानगी महापालिकेकडून दिली जाते. परंतु त्याआधी पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून त्याचा ना-हरकत दाखला घ्यावा लागतो. दिलेल्या परवानगीनुसार मंडप उभारणी होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दोन्ही विभागांची आहे. मात्र असे असतानाही अनेक ठिकाणी मंडप उभारताना रस्त्याचा अध्र्याहून अधिक भाग व्यापण्यात आल्याचे दिसून येत आहे.

वाहतुकीला अडथळा

रस्त्याचा निम्मा भाग गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांनी व्यापल्याने त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. मंडपांच्या अडवणुकीमुळे वाहनांना मोठय़ा प्रमाणावर अडथळा निर्माण होऊ लागला असून नागरिकांनीदेखील तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मीरा रोड येथील रामदेव पार्क, भाईंदर पश्चिम येथील मॅक्सस मॉल आदी परिसरात अशा पद्धतीने वाहतुकीला अडथळे ठरणारे मंडप उभारणीचे काम सध्या सुरू आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.