कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील मुख्य फार्मासिस्ट अनिल शिरपूरकर यांनी आपल्या मालकीचा डोंबिवली देसलेपाडा लोढा हेरिटेज गृहसंकुलातील गाळा पालिकेच्या आरोग्यवर्धिनी दवाखान्यासाठी भाड्याने दिला आहे. पालिकेत नोकरी करून पालिकेला आपला मालकीचा गाळा भाड्याने दिल्याने शिरपूरकर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वर्तणूक नियमातील ऑफिस ऑफ प्राॅफिट नियमाचा भंग केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आयुक्तांकडे दाखल तक्रारींची दखल घेऊन वैद्यकीय आरोग्य प्रमुखांंना यासंदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या महिन्यापूर्वी ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण बाहेर काढले आहे. हे प्रकरण बाहेर येऊनही पालिकेतील वरिष्ठ, वैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख याविषयावर गुपचिळी धरून असल्याने तक्रारदारांसह या प्रकरणाशी संबंधितांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी करत असताना पालिकेला अंधारात ठेऊन बाहेर कंपन्या स्थापन करून त्यामधून आर्थिक लाभ घेणे, पालिकेत नोकरी करून आपले औषधाचे परमिट इतरांना व्यवसायासाठी देणे. असे गैरप्रकार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना गेल्या दहा वर्षापूर्वी पालिकेने सेवेतून बडतर्फ केले आहे. तीच चूक शिरपूरकर यांनी केली आहे.
पालिकेत नोकरी करूनही पालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी डोंबिवली देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज वास्तु सृष्टीमधील गाळा फार्मासिस्ट अनिल शिरपूरकर यांनी भागीदारी पध्दतीने ३३ हजार रूपयांच्या भाड्याने पालिकेला दिला आहे. शिरपूरकर पालिकेत नोकरी करून वेतन घेतात. त्याच बरोबर आपला गाळा पालिकेला भाड्याने देऊन त्या माध्यमातून शिरपूरकर हे पालिकेतून दुहेरी आर्थिक लाभ घेत आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वर्तणूक नियमातील ऑफिस ऑफ प्राॅफिट नियमाचा शिरपूरकर भंग करत असल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ताटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी या तक्रारींची दखल घेऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
आयुक्तांच्या निर्देशावरून सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदन गुळवे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांना अनिल शिरपूरकर यांच्या आरोग्यवर्धिनीसाठी केंद्रासाठी गाळा भाड्याने देण्याच्या प्रकरणाविषयी सविस्तर अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेतील काही वरिष्ठांनीही शिरपूरकर यांच्याकडून ऑफिस ऑफ प्राफिंट नियमाचा भंग झाला असल्याची कबुली खासगीत दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेधनात हा प्रश्न उपस्थिती करणार असल्याचे एका लोकप्रतिनिधीने सांगितले आहे.
वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा एक ठाणमांड्या गट वर्षानुवर्ष या विभागात आपली मक्तेदारी ठेऊन आहे. या गटाने यापूर्वी केलेल्या काही गैरप्रकारांपैकी हा पहिला प्रकार उघड झाल्याची चर्चा पालिकेत आहे. अधिक माहितीसाठी सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
सामान्य प्रशासन विभागाने अनिल शिरपूरकर यांच्या गाळ्याप्रकरणी सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच यासंदर्भातचा अहवाल सामान्य प्रशासनाकडे दाखल केला जाणार आहे.- डाॅ. दीपा शुक्ला, वैद्यकीय आरोग्य अधिकारी.