ठाणे : घोडबंदरमधील एका गृहसंकुलाने सहा महिन्यांत लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणीटंचाईमुळे टँकरपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. अनेक गृहसंकुलांनी लाखो रुपये पाण्यासाठी खर्च केले आहेत. त्यामुळे ठाण्यातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाणी टंचाईमुळे येथील टँकरलॉबी उन्मत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाणे शहरात विशेषत: घोडबंदर पट्ट्यात मोठ्याप्रमाणात गृहसंकुले उभी राहली आहेत. घोडबंदर भागात उचंच इमारती उभ्या राहिल्या तरीही येथे पाणी समस्या गंभीर झाली आहे. कोट्यवधी रुपयांची गृहखरेदी करुन येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे घोडबंदर पट्ट्यात टँकरचा सुळसुळाट झाला आहे.

 भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणीटंचाईबाबत तक्रार केली. या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटी या गृहसंकुलाने सहा महिन्यांत ठाणे महापालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली. तसेच पाणी अपुरे मिळत असल्याने गृहसंकुलाने या काळात दीड कोटी रुपये देखील खासगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली. दुसऱ्या गृहसंकुलाने १७ लाख रुपयांची पाणीपट्टी अदा केली, शिवाय टँकरपोटी १३ लाख रुपये अदा केल्याची माहिती उघड झाली. नागरिक कर्ज घेऊन कोट्यवधी रुपयांची घरे घेतात.

पुरेशा पाण्याअभावी त्यांना टँकरपोटी कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर या आधीही जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत नवीन गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. मात्र महापालिका पुरेसे पाणी देण्यात अपयशी ठरत असताना आजही उंचच उंच इमारतींना परवानग्या दिल्या जात आहेत. त्यामुळे टँकर लॉबीला पोसण्याचे काम होत असल्याचा आरोप केळकर यांनी केला. शीळमध्ये नऊ मोठी गृहसंकुले असून येथे दिवसातून एक तास देखील पाणी मिळत नसल्याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला.