Badlapur School Case : बदलापूर येथील प्रसिद्ध आदर्श विद्या मंदिर शाळेत शिशू वर्गातील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. शाळेतील शिपायाकडून या मुलींवर अत्याचार करण्यात आले असतानाही या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांकडून विलंब झाला. धक्कादायक म्हणजे पीडितेची आई दोन महिन्यांची गरोदर आहे. अशा अवस्थेतही तिला पोलीस ठाणे आणि रुग्णालयात १० तासांपेक्षा जास्त वेळ ताटकळत ठेवण्यात आले. एका नातेवाईकाच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“प्रथम आम्ही वात्सल्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आणि लैंगिक अत्याचाराची प्राथमिक माहिती झाल्यानंतर तिची पुन्हा सार्वजनिक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करावी लागली. पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवल्यानंतर वैद्यकीय तपासणी करणे हे मुलगी आणि तिची आई दोघांसाठी तणावपूर्ण होते”, असे नातेवाईकाने सांगितले.

हेही वाचा >> Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!

पीडित मुलगी लहान असूनही पोलिसांनी पीडिता आणि तिच्या कुटुंबाप्रती कोणतीही संवेदनशीलता दाखवली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला. या संपूर्ण प्रकरणामुळे पीडितेची आई तणावाखाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना १०२ अंश सेल्सिअस ताप आहे.

गुन्हा दाखल करण्यास विलंब नाही – पोलीस

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब झाला नाही आणि तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांचे जबाब नोंदवून पुढील प्रक्रियेला सुरुवात केली.”

गुप्तांगात वेदना होऊ लागल्याने प्रकरण उजेडात

१३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ च्या दरम्यान आरोपी अक्षय शिंदे याने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. घरी आल्यानंतर या दोन्ही मुलींच्या गुप्तांगात वेदना होऊ लागल्या. त्यातील एका मुलीने यासंदर्भात तिच्या आजोबांना माहिती दिली. दादाने आम्हाला अयोग्यरित्या स्पर्श केला असं तिने तिच्या आजोबांना सांगितलं. त्यामुळे आजोबांनी तत्काळ तिच्या आई-वडिलांना यासंदर्भात कळवलं.

एफआयआरमध्ये काय नोंदवलं?

एफआयआरनुसार, ही घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली. दोन मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबाला १३ ऑगस्ट रोजी संशय आला, त्यांनी दुसऱ्या मुलीच्या कुटुंबातील सदस्याशी बोलल्यानंतर आपण लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यास जात असल्याचे सांगितले. यानंतर मुलीच्या पालकांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अहवालात तिच्या हायमेनचा भंग झाल्याचे दिसून आले. मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने तिच्या पालकांना सांगितलं की दादाने तिचे कपडे काढून तिच्या गुप्तांगाला स्पर्श केला.