अंबरनाथ : गेल्या काही वर्षात शहरांच्या सीमेवरच्या ग्रामपंचायतींवर नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांवर ताण येतो आहे. पाणी समस्या यात सर्वात मोठी आहे. अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील शहरांच्या वेशीवरच्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मिळणार आहे. त्यासाठी ३८ कोटी ६० लाखांचे प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम  टप्प्यात आहेत.

अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांप्रमाणेच या शहरांच्या वेशीवर असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही गेल्या काही वर्षात नामांकित गृहप्रकल्प उभे राहू लागले आहेत. शहराच्या धर्तीवर हे प्रकल्प उभे राहत असले तरी तेथील प्रशासन ग्रामपंचायत दर्जाचे आहे. वाढती लोकसंख्या आणि सुविधांचा अभावामुळे या इमारतींमध्ये नव्याने वास्तव्यास आलेल्या रहिवाशांचे हाल सुरू होतात असा अनुभव आहे. पुरेशा पाणी पुरवठ्याचा अभाव हा या वसाहतींची मोठी समस्या आहे.       ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य तसेच नागरी वस्त्यांमधील लोकप्रतिनिधींची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले होते.

दरम्यान, जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ३९ गावांमध्ये पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी ४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय रकमेला

मंजुरी देण्यात आली आहे. या यात कल्याण

तालुक्यातील पोसरी, शेलारपाडा, चिरड आणि पाली तसेच म्हारळ, वरप, कांबा आणि अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, मांगरूळ, खरड आणि खोणी या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.

या गावांना एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी पुरवण्याचे उद्दीष्ट असल्याचे खासदार डॉ.शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.