ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका भाजी बाजारात घाऊक दरामध्ये भाजी मिळते. त्यामुळे अनेकजण भाजी खरेदीसाठी येतात. पण भाजी खरेदी करताना सावधान…. काही भाजी विक्रेत्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजी ताजी दिसावी यासाठी भाजीला हिरवा रंग देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मुख्यत्वे कंटोला, कारली, भेंडी आणि इतर पालेभाज्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
जांभळीनाका भाजी बाजार ही ठाण्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून किरकोळ विक्रेते भाजी विक्रीसाठी घेऊन जातात. तसेच ठाण्यातील नागरिक देखील स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने बाजारात खरेदीसाठी जातात. परंतु काही विक्रेत्यांकडून गंभीर प्रकार केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. भाज्या ताज्या दिसाव्यात म्हणून पाण्याचा शिडकावा केला जातो. मात्र जांबळी नाका बाजारा भाज्या आकर्षक, ताज्या दिसाव्यात म्हणून कृत्रिम हिरवा रंग भाजीला लावण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. यात मुख्यत्वे कंटोला, कारली, भेंडी आणि इतर पालेभाज्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती काही नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांसह त्या भाजी विक्रेत्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिक येण्यापूर्वी त्या भाजी विक्रेत्यांनी तेथून पळ काढला होता. त्या भाज्या पाण्यात मिसळल्या असता, हिरवा रंग सर्वत्र पसरला होता.
व्हिडीओमध्ये काय आहे?
– भाजी पाण्यामध्ये मिसळल्यानंतर भाजीवरील हिरवा रंग निघून तो हिरवा रंग सर्वत्र पसरत असल्याचे दिसत आहे. हा रंग इतक्या प्रमाणात होता की, रस्त्यावर संपूर्ण हिरवा रंग पसरला होता. भाजी विक्रेत्याने पळ काढला असला तरी त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ असल्याचे व्हिडीओ पाहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. असा प्रकार घडला असला तरी याबाबत अद्याप कोणतीही कठोर कारवाई भाजी विक्रेत्यांवर झालेली दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी असे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत ठाणेनगर पोलिसांना विचारले असता, त्यांनी सांगितले की हा प्रकार घडला आहे. परंतु आमचे पथक त्या भाजी विक्रेत्यांना पकडण्यासाठी गेले असता, त्यांनी तेथून पळ काढला होता. अद्याप अन्न व औषध प्रशासनाने तक्रार दाखल केली नसल्याने अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झाले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.