वस्तू व सेवा करामुळे ठेकेदारांची कामांकडे पाठ; प्रवाशांच्या सुविधांची रखडपट्टी

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठाणे परिसरातील स्थानके व आगारांचा कायापालट करण्यासाठी प्रवाशांनी धरलेल्या रेटय़ानंतर महामंडळाने सुविधा उभारणीची कामे हाती घेतली खरी; पण वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) या कामांसाठी ठेकेदारच मिळेनासे झाले आहेत. कल्याण, ठाणे, बदलापूर आणि शहापूर येथील एसटी स्थानकांमध्ये प्रवासी शेड उभारणे तसेच स्थानक परिसराला कुंपण घालण्यासारख्या कामांसाठी काढलेल्या निविदांना प्रतिसादच मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आता या कामांसाठी फेरनिविदा काढण्याची वेळ ओढवली आहे.

ठाणे आणि कल्याण बसस्थानकातील पत्रे खराब झाल्याने पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात उन्हाचे चटके आणि पावसाळ्यात पाण्याचा सतत अभिषेक होत असतो. त्याचप्रमाणे बदलापूर आणि शहापूर येथील बसस्थानकाच्या जागेत अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याण आगरात उत्तम दर्जाची पत्र्यांची प्रवासी शेड उभारणे तसेच बदलापूर आणि शहापूर येथील आगारात संरक्षित भिंत उभारण्याच्या कामाची निविदा काढण्यात आली. गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने आता फेरनिविदा काढण्यात आली आहे. मध्यंतरी जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक कंत्राटदारांनी सरकारी कामे घेण्यात टाळाटाळ सुरू केली. त्याचा फटका एस.टी. महामंडळाच्या कामांनाही बसला आहे.

या कामांसाठी सहा महिन्यांची मुदत आहे. मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिने जातील. त्यामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत तरी ही कामे होण्याची शक्यता नाही. त्यामुळे एस.टी. प्रवाशांचे हाल मागच्या पानावरून पुढे सुरूच राहणार आहेत.

कामे काय?

* ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बसस्थानकावर उत्तम दर्जाचे पत्रे बांधण्यासाठी ४,११,९५६ रुपयांची निविदा.

* ठाणे विभागातील विभाग नियंत्रक कार्यालयाच्या गच्चीची विशेष दुरुस्ती करण्यासाठी १५,०,२७८ रुपयांची निविदा.

* कळवा येथील विभागीय कार्यशाळेतील टायर रूमचे जुने सीमेंट पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्यासाठी १२ लाख ९७ हजार ४४९ रुपयांची निविदा.

* कल्याण आगारातील सीमेंट पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्यासाठी ७ लाख ५० हजार ५२७ रुपयांची निविदा.

ठाणे तसेच कल्याण आगरातले गळणारे सिमेंट पत्रे काढून उत्तम दर्जाचे नवीन पत्रे टाकण्याचे काम मागच्या वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जीएसटीमुळे ठेकेदारांना काम करणे परवडत नसल्याने ठेकेदार काम करण्यास नकार देत आहेत. यावर्षी दुसरी निविदा काढण्यात आली असून ठेकेदार प्रतिसाद देतील अशी आशा आहे.

-संजय नल्लमवार, विभागीय अभियंता, एसटी परिवहन मंडळ, ठाणे.