कल्याण – परतीच्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले भातपीक भुईसपाट केले आहे. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये गुडघाभर पाणी आहे. त्यात भातपीके शेतात पाऊस, वाऱ्याने कोलमडली आहेत. त्यामुळे भाताच्या तुऱ्यामधील दाणा, खोडाचा (पोटरी) नवजात दाणा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या पाच महिन्याच्या काळात भात शेतीला पोषक असा पाऊस ठाणे जिल्ह्यात पडला. गेल्या दोन महिन्याच्या काळात भात पिकावर बगळ्या, खैऱ्या रोग पडले. मुसळधार पावसामुळे आणि शेतकऱ्यांनी दोन महिन्याच्या कालावधीत भात पिकावर जंतुनाशक, कीटकनाशक फवारणी केल्याने पीकावरील हे रोग उडून गेले आहेत. सोन्यासारखे पिकलेले भात पीक ताब्यात येण्यासाठी गणपतीनंतर पाऊस कमी होणे आवश्यक होता. परंतु, आता दिवाळी आली तरी पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

शेतामधील पावसाचे तुंबलेले पाणी असल्याने शेतांमध्ये चिखल आहे. गुडघाभर पाणी आहे. या पाण्यामुळे शेतात वारा, पावसामुळे कोसळलेले भात खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच, अनेक भात पिके ही येणाऱ्या १५ ते २० दिवसांनी कापणीला तयार होत आहेत. शेत कोरडे असेल तर कापलेली भात पिके शेतात पसरून ती वाळविणे शक्य होते. यामुळे कापलेले भात पीक शेताच्या बांधावर, माळरानावर नेण्याची मजुरांची वाहतूक कमी होते. कमी वेळेत जास्त कापणीचे काम होते. पण, आता पाऊस थांबला नाही आणि शेतामधील तुंबलेल्या पाण्याचे प्रमाण कमी झाले नाहीतर कापणी करताना शेतामधील भात पीक माळरानावर वाळविण्यासाठी न्यावे लागेल. काही शेतकरी यंत्राच्या साहाय्याने भात पीक कापतात. त्या सयंत्राची चाके शेतामधील चिखलात रूतण्याची भीती यांत्रिक पध्दतीने भात कापणाऱ्या शेतकऱ्यांना वाटत आहे.

ठाणे जिल्ह्यात चालूवर्षी नियमित भात लागवडीचे आणि सगुणा भात लागवड तंत्राने केलेली भात पिके जोमाने आली आहेत. अनेक भात पिके आता तुऱ्यात (लोंगवा) दाणा तयार झाल्याने कापणीला आली आहेत. ही भात पिके कापणीनंतर घराजवळ ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना खळी करायची आहेत. पाऊस थांबत नसल्याने खळी करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. तयार भाती पिके वेळेत कापली नाहीतर तुऱ्यातील दाणा गळून पडण्याची भीती आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे अशा अनेक बाजुने ठाणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे.