डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील व्यापार संकुलातील वस्तू घरपोच वितरित करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या सुमारे ५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बंद पुकारला आहे. त्यामुळे पलावा भागातील व्यापारी संकुलातून घरपोच पाठविण्यात येणाऱ्या वस्तुंची सेवा ठप्प झाली आहे. या संपाला मनसेच्या डोंबिवली विभागाने पाठिंबा दर्शविला आहे. जोपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार मनसे विधानसभा सचिव अरूण जांभळे यांनी व्यक्त केला.

पलावा भागात मोठी व्यापारी संकुले, उपहार गृहे, विविध घरगुती वस्तु विक्रीची दालने आहेत. डोंबिवली, कल्याण परिसरातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे या व्यापारी संकुलामधून नागरिकांच्या मागणीप्रमाणे झोमॅटो कंपनीचे घरपोच वस्तु वितरण करणारे कर्मचारी ग्राहकांना दिवस, रात्र घरपोच सेवा देतात. या परिसरात झोमॅटोचे सुमारे ५० हून अधिक कर्मचारी सेवा देतात. या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या वाढत्या व्यापाप्रमाणे कंपनीकडे आपल्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले आहे. यापूर्वी त्याचा विचार झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

यापूर्वी किलोमीटर मागे आम्हाला ३५ ते ४० रूपये मिळत होते. हा दर आता २५ रूपयांवर आला आहे. त्यामुळे किलोमीटर मागील दर वाढविण्यात यावा. कामाचा विशेष मेहनताना वाढून मिळावा. आम्ही कर्मचारी दुचाकीवरून वाहतूक वर्दळीवर मात करत ग्राहकाला वेळेवर सेवा मिळेल यासाठी प्रयत्नशील असतो. अनेक वेळा दुचाकीवरून प्रवास करताना समोरून येणाऱ्या वाहनाने, दुचाकी घसरून अपघात होतो.

यावेळी कर्मचाऱ्याला दहा लाखाचा विमा मिळाला पाहिजे. कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी सुरक्षिततेची हमी कंपनीने घेतली पाहिजे, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. काही महिन्यापूर्वी झोमॅटो कंपनीचा एक कर्मचारी दुचाकीवरून जात असताना खोणी गाव हद्दीत अपघातात मरण पावला. त्याला कोणतेही आर्थिक लाभ मिळाले नाहीत. त्या कर्मचाऱ्याचे पालक काही भरपाई मिळेल या प्रतीक्षेत आहेत, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

मनसेचे डोंबिवली विधानसभा सचिव अरूण जांभळे यांनी सांगितले, की ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचे काम हे कर्मचारी करतात. त्यांच्या अनेक मागण्यात आहेत. त्या मागण्या झाल्या पाहिजेत. यासाठी या कर्मचाऱ्यांनी माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेतली. एक निवेदन त्यांना दिले आहे. या मागण्या रास्त असल्यामुळे मनसे नेते राजू पाटील यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही मनसे कार्यकर्ते या संपकरी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहणार आहोत. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, असे सचिव जांभळे यांनी सांगितले. पलावा भागात इतर भागातील घरपोच वस्तु विक्री करणाऱ्या वितरकांनी सेवा देऊ नये, असे आवाहन या संपकरी कर्मचाऱ्यांनी केले आहे.