टिटवाळा येथील आरक्षित भूखंड भूमाफियांच्या घशात; खेळाडू सरावापासून वंचित

कल्याण डोंबिवलीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या टिटवाळा शहरात एकही खेळाचे मैदान उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने या भागातील काही जमिनी मैदानांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी खेळासाठी भूखंड आरक्षित केले आहेत त्यावर चाळी उभारण्यात आल्याचा आरोप टिटवाळ्यातील खेळाडूंनी केला आहे. एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आग्रही असताना टिटवाळ्यात खेळासाठी सुसज्ज मैदानही उपलब्ध नसावे याबद्दल खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेने सुमारे १० वर्षांपूर्वी तयार केलेल्या विकास आराखडय़ाचे एव्हाना तीनतेरा वाजले असून अनेक आरक्षित भूखंडांवर मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकाम झाले आहे. टिटवाळ्यातील काही खेळाडूंनी क्रीडा संकुलासाठी टिटवाळा मंदिर आणि स्थानकादरम्यान असणाऱ्या सव्‍‌र्हे क्रमांक बीजी ९७ हा आरक्षित भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.

टिटवाळा शहरात खेळात प्राविण्य मिळवणारे अनेक खेळाडू आहेत. त्यांना सरावासाठी लवकरात लवकर मैदान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शहरातील विविध क्रीडा संघटनांना एकत्र करून लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. शहरात १८-१९ शाळा आहेत. मात्र एकाही शाळेला प्रशस्त मैदान नाही. खेळाचा सराव करण्यासाठी कल्याण, डोंबिवली किंवा ठाणे गाठावे लागते. त्यामुळे येथे लवकरात लवकर मैदान उपलब्ध होणे आवश्यक आहे.

विनायक कोळी, संस्थापक, विनायक मार्शल आर्ट्स