उल्हासनगरः कधीकाळी स्वच्छ वाहणारी पण आता प्रदूषणाने काळवंडलेली वालधुनी नदी पुन्हा एकदा जीन्स धुलाई कारखान्यांच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगरातील कारखाने बंद करण्यात आले होते. मात्र, शहराच्या सीमेवर वसार गावात पुन्हा काही जीन्स कारखाने गुप्तपणे सुरू झाले असून, त्यांचे रासायनिक सांडपाणी थेट नाल्याद्वारे वालधुनी नदीत मिसळवले जात आहे. विशेष म्हणजे आपले काळेशार सांडपाणी कुणाला दिसू नये यासाठी या कारखानदारांना थेट नालाच सिमेंट पत्र्याने झाकण्याचा प्रतापही स्थानिकांनी उघडकीस आणला आहे.

प्राचीन काळापासून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी शिलाहार राज्यात शिवमंदिराची उभारणी करण्यात आली. त्याच नदीवर नंतर ग्रेट इंडियन पेनिनसुला अर्थात जीआयपी कंपनीने धरण बांधले. त्याचा वापर पुढे बाटलीबंद पाण्यासाठी केला जाऊ लागला. पुढे या नदीवर औद्योगिक अतिक्रमण झाले. नंतर शहराच्या विस्तारीकरणात नदीत सांडपाणी मिसळले जाऊ लागले. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले. याच काळात उद्योगी उल्हासनगर शहरात जीन्स धुलाई कारखाने सुरू झाले. त्या कारखान्यातून निघणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे नदीची गटारगंगा झाली. पर्यावरणप्रेमींनी यात लक्ष दिल्याने न्यायालयाने या कारखान्यांना शहरातून हद्दपार केले. त्यानंतर हे कारखाने सांडपाणी प्रक्रिया करण्याचा खर्च वाचवण्यासाठी ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने सुरू होऊ लागले. ते आजतागायत सुरू आहेत.

एका कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर कारखाना हलवला जातो. ठोस आणि कडक कारवाई केली जात नसल्याने जागा बदलून कारखाने उभे राहतात. आता पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महापालिकेच्या वेशीवर असलेल्या वसार गावाच्या हद्दीत बेकायदा जीन्स धुलाई कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी उघडकीस आणली आहे.

सिमेंटच्या पत्र्यांच्या आडून ‘सांडपाणी मार्ग’

स्थानिकांच्या माहितीनुसार, या कारखान्यांतून बाहेर पडणारे प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी बाहेरून दिसू नये म्हणून सिमेंटच्या पत्र्यांनी झाकलेले गुप्त मार्ग तयार करण्यात आले आहेत. मात्र, रासायनिक सांडपाणी उघड्यावर टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

एकीकडे राज्य सरकार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार नदी संवर्धनासाठी आराखडा तयार करत असताना दुसरीकडे जीन्स धुलाई कारखाने सुरू असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यावर कधी कारवाई करणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. यापूर्वीही वांगणी, कल्याण ग्रामीण, बदलापूर ग्रामीण अशा भागात जीन्स धुलाई कारखाने सुरू असल्याचे उघडकीस आले होते. त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.