ठाणे – अनेक व्यक्ती कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, तसेच आवश्यक ज्ञान आणि कौशल्याशिवाय सदनिकांमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या बेकायदेशीर कृत्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. हे अनधिकृत कामगार निकृष्ट दर्जाची आणि धोकादायक रसायने वापरण्याची शक्यता असते, ज्यामुळे विषबाधा किंवा इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे आपल्या घरात पेस्ट कंट्रोल साठी येणाऱ्या कामगारांची आणि त्यांच्या संस्थांची माहिती सर्वांनी घ्यावी असे आवाहन परवाना प्राधिकरणा (Licensing Authority) द्वारे सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

घरात लागणारी वाळवी, झुरळ, पाल, मुंग्या आणि इतर सूक्ष्म कीटक होऊ नयेत म्हणून नागरिकांकडून एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण पेस्ट कंट्रोल अर्थातच कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. मात्र या कीटकनाशकांची फवारणी योग्य पद्धतीने केली नसल्यास त्याचे अनेक दुष्परिणामांना संबंधित घरात राहणाऱ्या नागरिकांना सामोरे जावे लागते. याच पद्धतीने अनेक व्यक्ती कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, तसेच आवश्यक ज्ञान आणि कौशल्याशिवाय सदनिकांमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तर अशा अनधिकृत व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता देखील असते. ते अर्धवट काम करून पैसे उकळू शकतात किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार करून मालमत्तेचे नुकसान करू शकतात. अधिकृत परवानाधारक पेस्ट कंट्रोल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि कामगार यांच्यावर शासनाचे नियंत्रण असते आणि ते विशिष्ट नियमांनुसार काम करतात. त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा सुरक्षित आणि प्रभावी असतात .त्यामुळे, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा संस्थेकडून पेस्ट कंट्रोल सेवा घेण्यापूर्वी, त्यांच्या अधिकृत परवान्याची आणि नोंदणीची खात्री करावी. अतिशय कमी दरात सेवा देणाऱ्या संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहावे. केवळ अधिकृत आणि नोंदणीकृत पेस्ट कंट्रोल सेवा पुरवणाऱ्यांनाच आपल्या घरी किंवा आस्थापनेत काम करण्याची परवानगी द्यावी. बेकायदेशीर पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांना काम देणे हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे, तर आपल्या मालमत्तेसाठी देखील धोकादायक ठरू शकते. जर आपल्या परिसरात कोणी अनधिकृतपणे पेस्ट कंट्रोल करताना आढळल्यास, तात्काळ ७०३९९४४६८९ व ८२०८८५५९७० या संपर्क क्रमांकवर परवाना अधिकाऱ्यास त्याची माहिती द्यावी, अशा पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांच्यावर किटकनाशक कायदा १९६८ व किटनाशक अधिनियम १९७१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल, असे आवाहन परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे यांनी केले आहे.