डोंबिवली – डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्ल्यांमध्ये मोटार वाहन चालक, दुचाकी स्वार मनमानी पध्दतीने वाहनतळाची सुविधा नसताना वाहने उभी करून ठेवत आहेत. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते. रस्ते, गल्ली बोळात नियमबाह्य पध्दतीने उभी करून ठेवलेली ही वाहने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भाग हा बाजारपेठेचा आहे. या परिसरात खरेदीसाठी येणारे नागरिक एक दिशा मार्ग, बस थांबे, विजेचा खांब, शाळेचा परिसर, स्वच्छतागृह यांचा आडोसा घेऊन नियमबाह्य पध्दतीने आपली दुचाकी, चारचाकी वाहने उभी करत आहेत. ही वाहने वाहतुकीला मोठा अडसर होत आहेत.

ही वाहने यापूर्वी वाहतूक विभागाकडून उचलली जात होती. मोटार रस्ता अडवून उभे असेल तर त्या वाहनाच्या चाकाला सापळा (जॅक) लावून ते वाहन जखडून ठेवले जात होते. आता ई चलन पध्दतीमुळे वाहतूक पोलीस रस्ता अडवून वाहन उभे असेल तर त्या वाहनाला आहे त्या ठिकाणीच ठेऊन ई चलन पध्दतीने दंड लावत आहेत. यापूर्वी वाहन सापळा लावून जखडून ठेवले की वाहन मालकाची वाहतूक पोलीस येईपर्यंत हैराणी होत होती. आता तो प्रकार राहिला नसल्याने मोटार मालक मनमानी पध्दतीने डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा करत आहेत.

अडथळ्यांचे मार्ग

डोंबिवली पूर्वेतील केळकर या २० फुटी रूंदीच्या रस्त्यावर दोन रांगेत रिक्षा वाहनतळ आहे. उर्वरित दहा फुटाच्या मार्गिकेतून एक दिशा मार्गिकेतून वाहने धावत असतात. या अरूंद रस्त्यावर काही दुकानांसमोर कायमस्वरुपी दुचाकी, मोटारी उभ्या असतात. बापूसाहेब फडके रस्त्यालगतच्या अरूंद आगरकर रस्ता आणि इतर गल्ल्यांमध्ये काँक्रिटीकरणाचे रस्ते करण्यात आले. या रस्त्यांचा वापर नागरिक वाहनतळ म्हणून करत आहेत.

ब्राह्मण सभेजवळील २० फुटी गल्ली वाहनानी गजबजून गेली आहे. या रस्त्यावरून वाहने नेताना चालकांना कसरत करावी लागते. ज्या इमारतींमध्ये वाहनतळाची सुविधा नाही, त्या इमारतींमधील रहिवासी रेल्वे स्थानक भागात पी. पी. चेंबर्स माॅल येथे वाहनतळ असताना आपली वाहने शुल्क देण्यास लागू नये म्हणून रस्त्यावर उभी करून ठेवत आहेत. आगरकर रस्त्यावरून एक मोटार आली की इतर वाहन चालकांना बाजुला थांबावे लागते.

के. बी. विरा शाळेसमोर पालिकेच्या कचरा गाड्या आणि मोटारी उभ्या असतात. ही वाहने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. शिवसेना मध्यवर्ति शाखेत नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक असली की याठिकाणी शाखेबाहेरील अरूंद रस्त्यावर मोटारींचा वाहनतळ तयार होतो आणि हा भाग वाहतूक कोंडीत अडकतो. शिवसेना नेत्यांनी शहराबाहेरील, वाहनतळ असलेल्या ठिकाणी बैठक घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. आमदार राजेश मोरे कल्याण ग्रामीणचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी २७ गाव भागात आपल्या बैठका घ्याव्यात. डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात घनश्याम गुप्ते रस्ता, महात्मा फुले रस्ता, महात्मा गांधी रस्ता भागात मोटारींची घुसखोरी आहे.