लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : नगर येथील रहिवासी असलेला नवनियुक्त पोलीस कर्मचारी सोमवारपासून ठाणे पोलीस दलात त्याचे कर्तव्य बजावण्यास सुरूवात करणार होता. परंतु त्यापूर्वीच त्याच्याकडील रूजू होण्याची, इतर महत्त्वाची कागदपत्र आणि गणवेशाची बॅग रिक्षात विसरला. परंतु वाहतुक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत ही बॅग त्याला पुन्हा मिळाली. बॅग मिळताच कर्मचाऱ्याचा जीव भांड्यात पडला.

नगर येथील श्रीगोंदा भागात दत्तात्रय शिंदे हे राहतात. त्यांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून ते ठाणे पोलीस दलात सोमवारपासून रूजू होणार होते. मागील अनेक वर्षांपासून पोलीस होण्याचे स्वप्न आता साकार होणार होते. त्यामुळे दत्तात्रय आणि त्यांचे कुटुंबिय आनंदात होते. सोमवारी हजर व्हावे लागणार असल्याने ते रविवारी ठाण्यात आले होते. त्यांच्या ठाण्यातील नातेवाईकांकडे ते वास्तव्य करणार होते. रविवारी सायंकाळी ते रेल्वेने ठाणे स्थानकात आल्यानंतर त्यांनी स्थानक परिसरातील रिक्षा थांब्यावरून धर्मवीर नगर येथे जाण्यासाठी रिक्षा प्रवास सुरू केला. परंतु रिक्षातून उतरल्यानंतर त्यांची बॅग त्या रिक्षात राहिली.

आणखी वाचा-विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा ठाण्यात

काहीवेळाने दत्तात्रय शिंदे यांना याबाबत लक्षात आल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण त्या बॅगेत पोलीस दलात रूजू होण्याची सर्व कागदपत्र होते. ही कागदपत्र मिळाली नाही तर त्यांच्या रूजू होण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा येणार होता. त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला आणि त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला. त्यानंतर शिंदे यांनी स्थानक परिसरात नेमणूकीस असलेल्या ठाणे वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. जाधव आणि पोलीस हवालदार एस.बी. आसबे यांनी सुमारे दोन तास त्या रिक्षा चालकाचा शोध घेऊन दत्तात्रय यांची हरविलेली बॅग त्यांना पुन्हा दिली. या बॅगेमध्ये जातीचा दाखला, त्यांचे पोलीस दलात रूजू होण्याची कागदपत्र, पोलीस गणवेश, आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच इतर साहित्य होते. पोलिसांच्या या मदतीमुळे दत्तात्रय शिंदे यांचा जीव भांड्यात पडला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important documents forgotten in rickshaw recovered within two hours due to police vigilance mrj