बदलापूर: एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नुसार पुनर्विकासाला गती देण्यासाठी आणि रस्ते रुंदीकरणासाठी आता कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्वच सहा मीटरचे रस्ते नऊ मीटरचे केली जाणार आहेत. याबाबतची घोषणा कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने नुकतीच केली आहे. यामुळे शहरातील पुनर्विकासाला गतीमुळे आणि रस्ते मोठे होते. त्याचा प्रत्यक्ष नागरिकांना फायदा होईल.
गेल्या काही महिन्यात कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी शहरातील रस्ते आणि चौक रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे त्यातून शहरातील सुमारे १४ चौक रुंद करण्यात आले आहे. चौकातील जुने अतिक्रमण आणि बांधकाम हटवण्यात आली आहे त्यामुळे चौकांमध्ये होणारी कोंडी बहुतांशी सुटली आहे त्यातच वर्दळीच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन होते आहे नागरिकांना या सिग्नल यंत्रणेची अद्याप सवय न झाल्याने अनेकदा काही खटके उडतात. मात्र चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात चौकातील जुने विद्युत खांब हटल्यानंतर येथील कोंडी पूर्णपणे सुटेल.
याच धर्तीवर आता शहरातील रस्ते रुंद करण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील सर्व सहा मीटर रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्या लगतच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा बळ मिळेल, अधिकचा चटई क्षेत्र निर्देशांक वापरता येईल, तसेच स्वयं पुनर्विकासात रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
पुररेषेमुळे रखडलेला पुनर्विकास होणार
गेल्या काही वर्षात उल्हास नदी किनारी पूररेषा निश्चितीकरणामुळे येथील विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे रस्ते नऊ मीटर करण्याच्या निर्णयामुळे पुनर्विकासाला गती मिळेल. बांधकाम व्यावसायिक अधिकचे चटई क्षेत्र निर्देशांक घेतील आणि त्याचा पालिकेच्या तिजोरीलाही फायदा होईल. नागरिकांना कमी दरात घरे उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती बांधकाम क्षेत्रातीप तज्ञांनी दिली आहे.
एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नुसार आता सहा मीटरच्या रस्त्यांचे अस्तित्व उरणार नाही. नऊ मीटरच्या रस्त्याप्रमाणेच इमारतींना बांधकाम परवानगी दिली जाते. आधी बांधकाम व्यावसायिक यासाठी स्वतः पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाची संपर्क करत रस्ते नऊ मीटर करण्याची मागणी करायचे. वैयक्तीय मागणीनंतर त्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होत असे. आता शहरात सरसकट हे धोरण स्विकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे.
प्रतिक्रिया: आधी काही प्रकरणे येत होती. मात्र आम्ही सरसकट हे धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यावर लवकरच सूचना आणि हरकती मागवून सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात येईल. यामुळेपुनर्विकास आणि रस्ते रुंदीकरणाला गती मिळेल – मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.