डोंबिवली – डोंबिवली जवळील २७ गावांमधील १२ गावांमध्ये दहा वर्षापूर्वी सर्व्हे क्रमांक ७१, ६८ आणि ६३ च्या जमिनींवर भूमाफियांनी उभारलेल्या ४१ बेकायदा इमारती आणि डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारणारे भूमाफिया यांच्यात बहुतांशी साम्य आहे. यांची इमारतींची बनावट कागदपत्रे, मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार करण्याची पध्दती एकच आहे. त्यामुळे २७ गाव आणि डोंबिवली शहरातील अशा एकूण १०६ बेकायदा इमारतींच्या एकूण ४२४ भूमाफिया, त्यांचे पंटर यांची एकत्रितपणे चौकशी सुरू करावी. या माध्यमातून मोठा आर्थिक घोटाळा उघड होणार आहे, अशी तक्रार डोंबिवलीतील निर्भय बनो संस्थेचे संस्थापक महेश निंबाळकर यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) संचालकांकडे केली आहे.
या तक्रारींमुळे भूमाफियांचे कागदोपत्री आर्थिक व्यवहार उघड होणार असल्याने या दोन्ही प्रकरणांमधील भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. दहा वर्षापूर्वी डोंबिवली जवळील २७ गावांमधील जमीन भूमापन सर्व्हे क्रमांक ७१, ६८, ६३ जमिनींवर ८४ भूमाफियांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे बनावट नावाचे सही शिक्के तयार केले. या कार्यालयांची बनावट कागदपत्रे तयार करून २७ गाव हद्दीतील निळजे, भोपर, आडिवली ढोकळी, कोळे, नांदिवली, माणगाव, सागाव, सोनरापाडा, काटई, सागाव हद्दीत एकूण ४१ बेकायदा इमारती उभारल्या. या इमारती उभारण्यासाठी लागणारी बनावट मंजुरीची कागदपत्रे एक विशिष्ट भूमाफिया आणि त्याची टोळी करत होती.
ही कागदपत्रे भूमाफियांनी आपण कोठे कागदोपत्री अडकू नये म्हणून आपले वाहन चालक, इमारतींवरील मुकादम, आंध्रप्रदेश, झारखंड, उत्तरप्रदेश, कर्नाटक भागातील मजूर यांच्या नावे तयार केली. या कष्टकरी, मजुरांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, राष्ट्रीयकृत, खासगी बँकांमधील बँक खाती यांचा वापर करून घर खरेदीदारांना विकलेली घरे आणि त्या माध्यमातून मिळालेले पैसे भूमाफियांनी या कष्टकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून घेतले. या कष्टकऱ्यांना काही समजून न देता ते पैसे परस्पर काढून घेतले.
या कष्टकऱ्यांना भूमाफियांनी ५० हजार ते लाखभराच्या रकमा देऊन चौकशीसाठी बँका, पोलीस यांचा ससेमिरा नको म्हणून आपल्या परप्रांतामधील गावी पाठवून दिले. या माध्यमातून या भूमाफियांनी शासन, प्राप्तिकर विभाग, जीएसटीचा कोट्यवधीचांचा महसूल बुडविला आहे.
२७ गावांमध्ये बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफिया बेकायदा इमारती उभारल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होत नाही हे पाहून या भूमाफियांनी डोंबिवलीत शेकडो बेकायदा इमारती उभारल्या आहेत. कडोंमपा हद्दीतील बेकायदा इमारतींची संख्या दोन लाख ३५ हजार आहे. यामधील ६५ बेकायदा इमारती वास्तुविशारद संदीप पाटील यांच्यामुळे उच्च न्यायालयाच्या रडारवर आल्या आहेत.
या ६५ बेकायदा इमारतींमध्ये भूमाफिया, जमीन मालक, वास्तुविशारद आणि गुंतवणूकदार अशी सुमारे ३५० भूमाफियांची टोळी सक्रिय आहे. २७ गावात बेकायदा इमारती उभारणारे आणि डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभी करणारे भूमाफिया यांचे एकत्रित आर्थिक व्यवहार तपासले तर यामधून कोट्यवधीचा घोटाळा उघड होईल. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी निंबाळकर यांनी ईडीकडे केली आहे. यामधील बहुतांशी व्यवहार अली, बुट्टे, गुरव, कीर, भाटिया, साहु, दुबे, यादव अशा अनेक नकली नावांनी करण्यात आले आहेत, असे निंबाळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.